आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The First Women Rickshaw Driver In The Pink City Jaipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबी शहरातली पहिली रिक्षाचालक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण घोडेस्वार

जयपूर शहरात एखाद्या तरुणीने रिक्षा चालवून व्यवसाय करणे फार कठीण होते. एका महिलेने असे काम याशहरात आधी कोणी केलं नव्हतं. कारण या व्यवसायात पुरुषांचीच मक्तेदारी नि दादागिरीही आहे! सुरुवातीला तिला अनंत अडचणी आल्या, पण ती थांबली नाही. 
जयपूर... भारतातलं गुलाबी रंगाचं शहर. या शहरात रिक्षा चालवण्याचं काम करणारी पहिली महिला म्हणजे हेमलता कुशवाहा. तिची कहाणीही मोठी विलक्षण... दोन भावांची एकुलती बहीण.. घरात सर्वांची लाडकी..बालपण नि किशोरावस्था फार मजेत नाही पण खूप त्रासदायक म्हणता येईल अशीही गेली नाही. तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तिला नाचायला फार आवडायचं. शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेऊन तिने आपलं नृत्यकौशल्य विकसित केलं. हळूहळू ती राजस्थानचा लोकप्रिय नृत्यप्रकार भवई आणि इतरही प्रकार करण्यात पारंगत झाली.पुढे हे नृत्य तिचं उपजीविकेचं साधन झालं. पण तिच्या रूढीवादी कुटुंबाने लहान वयातच तिला लग्नाच्या बेडीत अडकवले.
लग्नानंतर हेमलता संयुक्त कुटुंबात दाखल झाली. जबाबदाऱ्या वाढल्या. अख्खा वेळ घरकामातच जायला लागला. तिच्या मनात मात्र काही तरी करून दाखवण्याची जिद्द होती.तिच्या अाशा-आकांक्षा पल्लवित व्हायच्या. काय करायचं हे चित्रं स्पष्ट नव्हत. पण काही तरी करायचंच ही धारणा मात्र पक्की होती! लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याआधीच ती आई झाली. अपत्यप्राप्तीनंतर ती अजूनच घरात अडकली. बाळ हळूहळू मोठं होत होतं. मात्र कौटुंबिक वातावरण सुखद नव्हतं. आर्थिक तंगी, नवऱ्याचा संशयी स्वभाव, रूढीवादी विचारसरणी, खर्चायला पैसे न देणे आणि होणारी मारहाण यामुळे त्यांचे सहजीवन विस्कटून गेले. दररोजच्या मारहाणीने शरीरासोबतच मनही जखमी झालं होतं. एकदा तिला प्रचंड मारहाण होऊन तिच्या हाताचे हाड मोडले. पैशांचा अभाव नि गावात राहत असल्यामुळे क्ष-किरण तपासणी होऊ शकली नाही. परिणामी तिचा एका हाताचा पंजा आजही तिरपा आहे. या जाचाला वैतागून तिने माहेरची वाट धरली होती. पण घरच्यांच्या दबावामुळे तिला नवऱ्याकडे परत यावं लागलं.  हेमलताकडे बाळाला दूध देण्याइतपतही पैसे नसायचे. ६-७ महिन्यांच्या बाळाला टाकून नृत्याचे कार्यक्रम करणे शक्य नव्हते. जयपूर शहरात एका मंदिरात भीक मागण्याची तिच्यावर वेळ आली. हेमलता थकली होती, पण तिने हार मानलेली नव्हती. तिचं शिक्षण फार नसल्याने नोकरीची शक्यता नव्हती. तिने आपल्या भावाला ऑटो चालवताना पाहिले होते. खूप प्रयत्न करून तिने २०१२ मध्ये वाहनचालक परवाना मिळवला. परवाना होता पण ड्रायव्हिंग नीट जमत नव्हती. २०१३ मध्ये ती ‘आजाद फाउंडेशन’ च्या संपर्कात आली नि तिचं आयुष्याने वेगळं वळण घेतलं. इथल्या प्रशिक्षणाने तिच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल केला. ती  कुशल ड्रायव्हर बनली. पण तिला कोणाकडे ड्रायव्हरची नोकरी करायची नव्हती. २०१४ मध्ये तिने वडील आणि बँकेच्या मदतीने स्वतःची ऑटोरिक्षा खरेदी केली व न घाबरता चालवायला लागली ! मुलाला शाळेत सोडून ती रेल्वे स्टेशनवर रिक्षा उभी करते. मुलाच्या शाळेच्या वेळात ती प्रवाशांची ने-आण करते. दिवसातून ६ ते ८ तास केल्यावर तिला बऱ्यापैकी कमाई होते. यातूनच ती ऑटोचे कर्ज आणि डिझेलचा खर्च भागवते. 
जयपूर शहरात एखाद्या तरुणीने रिक्षा चालवून प्रवासी वाहतूक करणे फार कठीण होते.एका महिलेने असे काम या शहरात आधी कोणी केलं नव्हतं..कारण या व्यवसायात पुरुषांचीच मक्तेदारी नि दादागिरीही आहे! सुरुवातीला तिला अनंत अडचणी आल्या.
पुरुषमंडळी तिला स्टेशनवर रिक्षा उभी करायला मज्जाव करायची. तिला ऑटो काढायला अडचण होईल अशी व्यवस्था करायची. २०१५ मध्ये प्री-पेड बूथवरून पावती घेताना तिथल्या पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन केलं, पण ती डगमगली नाही. पोलिसांच्या मदतीने त्याला धडा  शिकवला. यामुळे संतापलेल्या प्री –पेडवाल्याने तिला मारहाणही केली. प्रकरण कोर्टात गेलं. माघारीसाठी दबाव येऊनही ती आज लढते आहे. या वेळी रिक्षाचालक संघटना तिच्या बाजूने उभी राहिली. जयपूर महानगर चालक संघटनेने आपल्या कार्यकारिणीचा विस्तार करून शहरातल्या एकमेव महिला चालक हेमलताला सचिव केलं!
ती आता केवळ स्वत:चा विचार न करता महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते आहे.ऑटो स्टँडवर पिण्याचे पाणी, कचराकुंडी, प्रसाधनगृह, सावली यासारख्या सुविधांसाठी ती वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क करत असते.याशिवाय लोकांचा महिलांकडे आणि महिला चालकाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तिला वाटतं की अधिकाधिक तरुणींनी या व्यवसायात यायला हवं.म्हणजे लोकांची धारणा बदलेल. लोक या पेशाला आदर देतील. रात्री-अपरात्री प्रवास करायला महिलांना भीती वाटणार नाही. तिला आता ट्रक चालवण्याची इच्छा आहे.त्यासाठी तिने परवानाही काढला आहे. तिच्या मते शहर बससेवेत महिला ड्रायव्हरला संधी दिल्याने खूप फायदा होईल. प्रवासी महिला सुरक्षित समजतील स्वत:ला. तिच्या खाजगी जीवनातला संघर्ष अजूनही सुरूच आहे. तिने पासपोर्ट देखील तयार केलाय. परदेशात फिरण्याचे तिचे स्वप्न साकार होवो यासाठी तिला शुभेच्छा देऊन तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक तरुणी या क्षेत्रात येतील अशी आशा करूया !

लेखकाचा संपर्क - ९४०३७७४५३०