आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मते मिळवण्यासाठी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा फार्स : पृथ्वीराज चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी समुद्रात भराव टाकून शिवस्मारकाचे काम सुरू करण्याचा इव्हेंट घेण्यात आला होता. मधल्या काळात शांत बसल्यानंतर आता येऊ घातलेल्या निवडणुकीत मतांवर डोळा ठेवून शिवस्मारकाच्या पायाभरणीचा फार्स करण्यात आला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी लातुरात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र व राज्य  सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील फडणवीस सरकारने शिवस्मारकाचा जाणीवपूर्वक खेळखंडोबा केला असल्याचे त्यांनी सांगितले.  सरकारला चार वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सरकार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणार आहे. त्यावेळी कुणी विचारले की शिवस्मारकाचे काय झाले तर आपण उत्तर देऊ शकणार नाही हे ओळखून तातडीने विनायक मेटेंना पुढे करून शिवस्मारकाच्या पायाभरणीचा खेळ करण्यात आला. स्मारक व्हावे अशी सरकारची इच्छाच नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला.  


मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 31 टक्के मते मिळाली होती. उर्वरित मतांचे विभाजन झाल्यामुळे भाजप सत्तेवर आली. या वेळी आम्ही या विभाजन होणाऱ्या मतांना एकाच छत्राखाली आणण्याच्या प्रयत्नात आहोत. महाआघाडी झाली तर मोदींचा पर्यायाने भाजपचा पराभव पक्का आहे. त्यामुळे मोदी महाआघाडी होऊ नये यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करतील. तरीही सर्व विरोधी पक्ष एक आहेत, असे ते म्हणाले. सध्या भाजप सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. महागाई, दुष्काळ परिस्थितीमध्ये कोलमडलेले नियोजन, कर्जमाफीचे गाजर, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रफाल घोटाळा यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारविषयी संताप निर्माण झाला आहे. मागील निवडणुकांमध्ये केवळ आश्वसनांच्या भडिमारावर सत्ता काबीज करण्यास मोदी सरकारला यश मिळाले होते. गेल्या चार वर्षात एकाही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जाण्याची नैतिकता राहिलेली नाही.   देशाचा कृषी विकास दर घटत असून रुपयाचे मूल्य ढासळत असून केंद्र  व राज्य सरकार गंभीर अार्थिक संकटात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...