आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लूटमार करणारी आणखी एक टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली. या टोळीने गुजरात राज्यातील एका महिलेला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लूटमार केली होती. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 


पिंट्या भास्कर काळे (३५, रा. कोरेगांव, ता. श्रीगोंदे), सुनील भास्कर काळे (५०, रा. कोरेगांव, ता. श्रीगोंदे), मंगेश संजय चव्हाण (२१, रा. गुंडेगाव, ता. नगर) व वाल्मीक संजय चव्हाण (१८, रा. गुंडेगाव, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुजरात राज्यातील महिला मीनल रमेश परमार यांना फोन करून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले होते. परमार व त्यांच्या सोबतच्या इतर व्यक्तींना सोने घेण्यासाठी बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिखली गावच्या शिवारातील सायंतारा हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. ठरल्याप्रमाणे सोने घेण्यासाठी आल्यानंतर आरोपींनी परमार व इतरांना मारहाण करत त्यांच्याकडील एक लाख ७२ हजार रुपयांची रक्कम, मोबाइल बळजबरीने काढून घेत मारहाण केली. ही घटना १ फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी मीनल परमार यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पवार यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुन्ह्यातील काही आरोपी चिखली शिवारातील साकळाई मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. 


अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, रोहन खंडागळे, सचिन खामगळ, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, योगेश सातपुते, सागर सुलाने, रविकिरण सोनटक्के, योगेश गोसावी, दीपक शिंदे, सचिन कोळेकर आदींनी ही कामगिरी केली. 


वारंवार घडतात गुन्हे 
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लूटमार करण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. असे गुन्हे करणाऱ्या अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी गजाआड केले आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी काही गुन्हेगारांना पकडले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीदेखील असे अनेक गुन्हे उघड केले आहेत. परराज्यातील महिला व इतर व्यक्तींची लूटमार करणाऱ्या चार आरोपींना अटक केल्याने अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...