शिर्डी / शिर्डीत सहा महिन्यांच्या चिमुकलीस बेवारस सोडून महिला फरार

अज्ञात महिलेचा शोध  सुरू,  गुन्हा दाखल
 

दिव्य मराठी

Jun 01,2019 09:54:00 AM IST

शिर्डी - साईबाबा मंदिराजवळ असलेल्या गुरुस्थानाजवळ एका महिलेने शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीस बेवारस सोडून पलायन केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून शिर्डी पोलिस व साई संस्थान प्रशासन या महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, ही चिमुरडी सुखरूप असून तिला साई संस्थानने पोलिसांकडे साेपवले आहे.


साईबाबांची आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येतात. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेने सहा महिन्यांची चिमुकली सोडून देत पलायन केले. चिमुकली रडू लागल्याने तसेच तिच्या जवळपास कोणीच नसल्याने साईभक्तांनी संरक्षण विभागास कळवले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चिमुकलीस संरक्षण कार्यालयात आणले. या चिमुकलीची संस्थानच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती चांगली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेचा शोध केला सुरू आहे.

X