आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतिशील साहित्यिकाच्या जीवनाचा नितळ स्वर्णपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंत पोपळे

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ‘नाही मी एकला’ हे आत्मकथन म्हणजे त्यांच्या साहित्यिक, अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीच्या कार्याचा पारदर्शी व नितळ स्वर्णपट आहे. 

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३व्या अाखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे "नाही मी एकला' हे आत्मकथन म्हणजे त्यांच्या साहित्यिक, अाध्यात्मिक आणि सामाजिक चळवळीच्या कार्याचा पारदर्शी व नितळ स्वर्णपट आहे. त्यानी स्वजीवनात साधलेल्या विधायक नि रचनात्मक कामांचा तो सर्वोत्तम लेखाजोखा आहे. निरपेक्ष वृत्तीने वेगवेगळ्या स्तरावर उभालेल्या विधायक चळवळीचा स्वत:च तटस्थ साक्षी भावाने‌ दिब्रिटोंनी घेतलेला आढावा म्हणजेच "नाही मी एकला' हा आत्मकथन ग्रंथ. कारण या संपूर्ण आत्मकथनात कुठेच "मी'पणाचा लवलेश दिसत नाही. आत्मप्रौढीचा कुठेच बाज आढळत नाही. टिचभर करून हातभर केवळ स्वत:ची शेखी मिरवणाऱ्या आजच्या काही दांभिक साहित्यिकांसमोर म्हणूनच तो निश्चितच सरस ठरतो !


विश्व मानव कल्याणाचे मुख्य सूत्र संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये पदोपदी आढळते. "हे विश्वचि माझे घर' या संकल्पनेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी इखिल विश्वातील मानव समूहाला कल्याणाच्या हेतूने कुटुंब स्वरूपात सांधले आहे. संत रामदासांनी "चिंता करितो विश्वाची' म्हणत सामाजिक चिंतनाचा विश्वव्यापी संदेश दिला आहे. स्वामी विवेकानंदांनी स्त्री-पुरुष मानवी समूहाला बंधू-भगिनी संबोधून वैश्विक कौटुंबाचे सूत्र जगाला दाखवून दिले आहे. या आणि अशा अनेक महान भारतीय प्रतिभावंतांनी आपापल्या विचार/कृतीतून वैश्विक मानव कल्याणाचा पाया मजबूत केला. या सगळ्यांचे विचार, कार्य आणि विशेषत: साहित्य हे केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही मौलिक ठरत आले आहेत. अशा प्रतिभावंतांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव फादर दिब्रिटो त्यांच्या लेखन, चिंतन आणि व्याख्यानात प्रभावीपणे जाणवतो. तसे फादर दिब्रिटो स्वत:ही आवर्जून नम्रपणे मान्य करत दाखले नोंदवतात. मात्र संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदींच्या दाखल्याआडून फादर अप्रत्यक्षपणे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतात, असे तथाकथित विवेकशून्य साहित्यप्रेमींना  वाटते. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे केवळ ख्रिश्चन धर्मगुरू असल्याने ‘ते साहित्यिक आहेत‌ का ? धर्मगुरूंचे‌ लेखन हे साहित्य ठरू शकते का?' असे विवेकशून्य प्रश्न काही विरोधकांना पडले आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे काजव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहेत हे समजण्यासाठी अशा अांधळ्या साहित्य भक्तांनी त्यांचे "नाही मी एकला' हे आत्मकथन एकदा आवर्जून नजरेखालून घातले तरी त्यांच्या डोळ्यातील काजळी दूर होण्यासाठी पुरेसे आहे. लोकप्रबोधनासाठी मराठी साहित्याशी सामाजिक चळवळीची सांगड फादर दिब्रिटो यांनी घालून दाखवली आहे. त्यांनी धार्मिक / आध्यात्मिक अधिष्ठान बळकट करून समाजकार्याशी नाते एकरूप केले आहे. सामाजिक ऋणानुबंध हे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण आहे. धार्मिक आधिष्ठान, व्याख्यान, साहित्य आणि सामाजिक चळवळ या दिब्रिटो यांच्या लेखनामागच्या प्रेरणा आहेत. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले आहे. हे ‘नाही मी एकला' हे आत्मकथन ग्रंथ वाचल्यानंतर अधोरेखित होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो लिहितात, आमच्या वाडवडिलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते "भागरत' असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान््पिढ्यांचा "भावरता'चा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही आणि निसर्गासारखे निर्मळ असे हे आत्मकथन निश्चितच मराठी साहित्यप्रेमींना आवडेल. 

आर्चबिशप सायमन पिमेंटा यांच्याकडून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दीक्षा घेऊन धार्मिक कार्याला प्रारंभ केला. १९९२ मध्ये सुधीर फडके, रावे भुस्कुटे, आंदोलक आदिवासी महिला, पुष्पा भावे, शोषन्ना पाध्ये आदींच्या सहभागाने निर्भयता मेळाव्यात फादरनी हिरीरीने भाग घेऊन आपले प्रखर विचार मांडले. दहशतवादाच्या विरोधात १३ जुलै २००२ रोजी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी "दहशतवादाला नकार, सहिष्णुतेचा स्वीकार' या विषयावर आपले विचार प्रभावीपणे मांडले होते. आपल्या वसई येथील कार्यक्षेत्र परिसरात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही त्यांनी मोलाचे काम केले आहे. सुवार्ता मासिकाचे सन १९८३ ते २००७ दरम्यान फादर दिब्रिटो यानी दीर्घकाळ उत्तमपणे संपादन केले. अाध्यात्मिक वाटचालीबरोबर साहित्य निर्मिती फादरना महत्त्वाची वाटली. त्यापलीकडे जाऊन  फादर दिब्रिटो याना प्रसंगी रस्त्यावर उतरून सामाजिक चळवळ उभारण्याची‌ गरज वाटली. त्याची प्रेरणा त्यानी कार्डिनल सायमन पिमेंटा यांच्याकडून घेतली. आपल्या साहित्यिक प्रवासातील स्फूर्तिस्थान कवी कुसुमाग्रज असल्याचे फादर सांगतात. पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रकाशक दिलीप माजगावकर आदी दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. सुबोध बायबल नवा करार या ग्रंथासाठी त्याना सन २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार  मिळाला. महाराष्ट्र शासनाकडून सन २०१३-१४चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारही मिळाला आहे. पोप संत जाॅन पाॅल आणि संत मदर तेरेसा अशा वैश्विक प्रतिभावंतांच्या सहवासाचे भाग्यही फादर दिब्रिटो यांना लाभले आहे. या जीवनातील घडामोडींचा धांडोळा त्यांनी आपल्या आत्मकथनात घेतलेला आहे. 


विविध बहुआयामी विचारांना कवेत घेणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आत्मकथन सर्व मराठी वाचकांसाठी विचार करायला भाग पाडणारे आहे.
लेखकाचा संपर्क : 98811 96688

बातम्या आणखी आहेत...