आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेला जी स्वप्न दाखवली ती पुर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले - अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - जिल्हयात पाच वर्षात एकही उद्योग आला नाही. राज्यातील महत्त्वाच्या कंपन्या बंद पडत आहेत. लोकांचा रोजगार जात आहे आणि गेलाही आहे. सरकारने जे स्वप्न दाखवले ते स्वप्न पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत केला.  राज्याची कायदा सुव्यवस्था नीट रहावी यासाठी मोठ पोलीस बळ लागतं मात्र सरकारने पोलीस भर्ती केलीच नाही. पोलिस भरतीसह इतर सगळ्या भरत्या सरकारने थांबवल्या आहेत. कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत.परंतु आचारसंहिता लागल्यानंतर कुठली कामे पूर्ण करणार असा सवाल करतानाच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नुसत्या घोषणा केल्या आहेत असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.  कर्नाटक येथे येडुरप्पा यांच्या समर्थक आमदारांनीच त्यांचीच गाडी अडवली कारण मंत्रिपद दिले नाही. आपल्या मंत्रिमंडळातही शेवटपर्यंत काही पदे रिक्त ठेवली. यवतमाळला तीन - तीन मंत्रिपदे दिली पण अधिकार दिले नाही. त्या मंत्रिपदाला काही अर्थ आहे का ? इथल्या मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात नाही असेही अजितदादा पवार म्हणाले.  मतदानाच्यापूर्वी अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडणार आहेत. भाजप शिवसेनेकडे जागाच शिल्लक नाही. भाजप शिवसेनेचे जुने लोक अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत कोण कोणत्या पक्षात आहे हे सांगता येणार नाही अशी पुष्टी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी जोडली.  अफवांचा पेव फुटले आहे. भुजबळ साहेबांबाबत अफवा पसरवली जात आहे. भुजबळ साहेबांनी याबाबत स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. वेगळाच मुद्दा आणून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकार करत आहे असेही अजितदादा पवार म्हणाले. पीक विमा कंपन्या गडगंज झाल्या परंतु माझा शेतकरी कंगाल झाला आहे. कर्जमाफी तीन- तीन वर्ष चालते का? असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.  सांगली, कोल्हापूर, सातारा पुरग्रस्त भागात प्रशासन अपयशी ठरले आहे असा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. एक एकराला पीक कर्ज माफी मुख्यमंत्री यांनी जाहीर केली आहे परंतु ती कमी असून ती सरसकट कर्जमाफी देण्याची गरज होती. सरकार दिलासा देण्यात कमी पडले आहे असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बजोरिया, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी उपस्थित होते.