आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांकडून ‘झाडे’झडती : सरकारने ३३ कोटी झाडे चुकीच्या पद्धतीने लावली, त्यापैकी फक्त ५० टक्केच जगली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वृक्षारोपणासाठी किमान १४० दिवस वय असणारे झाड हवे. पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्याने लावलेली ३३ कोटी झाडे केवळ ६० ते ७० दिवस वयाचीच अाहेत. ती चुकीच्या पद्धतीने लावली असून यामुळेच ५० टक्के झाडेही जगली नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यांवर बोलताना वडेट्टीवार यांनी वन, कृषी आणि नगरविकास खात्याच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, वन खाते ३३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा करत आहे, पण ते अशास्त्रीय पद्धतीने लावले जात आहेत. नियमाप्रमाणे किमान १४० दिवसांचे झाड लावायला हवे. पण सरकारने दोन महिन्यांपूर्वी नर्सरी उभारल्या आहेत. येथे तयार केलेली रोपे फार तर ६० ते ७० दिवसांचीच आहेत. झाडे लावण्यासाठी एप्रिलमध्येच खड्डे केले पाहिजे होते. त्यावर बाहेरून आणून सुपीक माती टाकायला हवी. यामुळे जमिनीची धूप वाढते. असे असताना वृक्षारोपण करण्यापूर्वी खड्डे खोदण्यात आले. यामुळे ही झाडे जगण्याची शक्यताच नाही. ५० टक्क्यांहून कमी झाडे जगली असावीत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

तिसरे अभयारण्य कशाला?
वन खाते चंद्रपूर जिल्ह्यात कनाळगाव येथे राज्याचे तिसरे अभयारण्य तयार करण्याच्या विचारात आहे, परंतु अभयारण्याची गरजच नाही. २० गावांनी ठराव घेऊन या अभयारण्यास विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे २५ गावांचे रस्ते बंद होणार आहेत. एका वाघाला २५ चौकिमी क्षेत्र लागते. सध्या ताडोबात ८९ वाघ असून तेथील ४३५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्यांना कमी पडत आहे. येथील वाघांनाच इतरत्र स्थलांतरित करण्याची गरज आहे. त्यामुळे हे अभयारण्य अनावश्यक आहे. हे अभयारण्य तेलंगण राज्याला लागून आहे. येथे अनेक जणांनी आधीच जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यांना याचा लाभ मिळावा म्हणून हा प्रकल्प लाटण्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला.