आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ: एकनाथ खडसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  ‘या सरकारला दुष्काळाचे अजिबात गांभीर्य नाही. पाण्यासाठी माझ्यावर अक्षरश: माझ्याच सरकारकडे भीक मागण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला. वारंवार पाठपुरावा करूनही दुष्काळी उपाययोजना होत नसतील तर आपल्याला विधानसभेच्या पायऱ्यांवर आपल्याच सरकारविरोधात निदर्शने करण्याची परवानगी द्या, अशी उद्विग्न मागणीही त्यांनी या वेळी केली. विधानसभेत सुरू असलेल्या दुष्काळावरील चर्चेदरम्यान त्यांनी ही टीका केली. या चर्चेदरम्यान विरोधकांनीही सरकारच्या असंवेदनशील कारभारावर कोरडे ओढले.  

 
राज्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून या मुद्द्यावरून अधिवेशन काळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेत मंगळवारी या प्रश्नावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी बाकावरील एकनाथ खडसेंनी सरकारला खडे बोल सुनावले. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांबाबत आपण स्थानिक प्रशासन तसेच सरकारकडेही गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत असल्याचे सांगत दुष्काळाबाबत सरकारचा पोरखेळ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. वीज देयके भरली नसल्याने आपल्या मतदारसंघात १६ वेळा पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कृषी पंपाच्या धर्तीवर पाणी योजनांची वीज खंडित न करण्याचे धोरण सरकारने राबवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. आमच्याच मतदारसंघात जर आमच्यावर तोंड लपवून फिरण्याची वेळ येत असेल तर इतरांचे काय होत असेल, असा सवाल करत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी केली.

 

खडसेंप्रमाणेच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्राचे दुष्काळाबाबतचे निकष स्वीकारताना राज्यातील मंत्र्यांचे डोके ठिकाणावर होते का, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला तुमच्याकडून रामराज्य अपेक्षित होते, तुम्ही तर थेट राम मंदिर बांधायला निघालात. मंदिराने दुष्काळ हटणार नाही, त्यासाठी सरकारी मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही दुष्काळी परिस्थितीत सरकारने करावयाच्या उपाययोजनांबाबत अनेक सूचना केल्या. नुसत्या घोषणा करण्याऐवजी अंमलबजावणी करा, असे ते म्हणाले. 


दरम्यान, दिवाळीनंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, दिवाळी होऊन पंधरा दिवस झाले तरी मंत्रिमंडाळाचा अद्याप विस्तार झाला नसल्याने ते आक्रमक झाले असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे विराेधक आता सरकारला  अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांत वेगवेगळ्या मुद्यांवरून घेरण्याची तयारी करत असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलताना सांगितले.

 

संगणकावरून दुष्काळ जाहीर हे गंभीर : थोरात  
राज्यात दुष्काळ असताना तापी, दमणगंगा, नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातला दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केला. सप्टेंबर २०१७ मध्ये केंद्र सरकारसोबत केलेला एमओयू रद्द करून या नदी खोऱ्यातील पाणी वाटपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या यांत्रिक पद्धतीवर टीका केली. संगणकावरून पाहणी करत जर दुष्काळ जाहीर होत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे सांगत प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करा, अशी मागणी त्यांनी केली.

 

मंत्री शाळेत तरी अभ्यास करत होते ? : पवार  
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना चांगलेच टोले लगावले. या सरकारमधील मंत्र्यांना काहीही विचारले की अभ्यास सुरू आहे, असे उत्तर मिळते. एवढे दिवस झाले तरी सरकार कसला अभ्यास करत आहे, हे आम्हाला अद्याप समजले नसल्याचे सांगतानाच या सरकारमधील मंत्र्यांनी शाळेत तरी एवढा अभ्यास केला होता का, असा टोला त्यांनी लगावला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना पाच लाख रुपयांची मदत करा, फळबागा आणि नगदी पिकांना हेक्टरी एक लाख, तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार एवढी मदत करण्याची मागणी पवार यांनी या वेळी बोलताना केली.   

 

बातम्या आणखी आहेत...