आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - भाजप सरकार देशात सीएए, एनआरसी आणून काय साध्य करू पाहत आहे. सरकारला रजिस्टर बनवायचेच असेल तर बेराेजगारीचे रजिस्टर बनवावे. यापूर्वीही दुसऱ्या देशातील लाेकांना नागरिकत्व देण्याचा अधिकार हाेताच. हा कायदा करून सरकारने काय साध्य केले, असा सवाल रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी उपस्थित केला.
‘दिव्य मराठी’तील संपादकीय सहकाऱ्यांशी वार्तालाप करताना आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले की, देशात प्रचंड प्रमाणात बेराेजगारी वाढली आहे. काेट्यवधी लाेक बेराेजगार आहेत. सरकारने तत्काळ या बेराेजगारांचे रजिस्टर बनवायला हवे. या आधी परदेशी लाेकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार सरकारला हाेता. अनेकांना नागरिकत्व दिलेही आहे. मग आताच हा कायदा बनवण्याची सरकारला काय गरज वाटली. सरकार ज्या हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने वागत आहे. पण खरेच हिंदू राष्ट्र बनू शकेल कायॽ हिंदू राष्ट्रात घुसखाेरी हाेणारच नाही का? असा प्रश्न उपस्थित करून आनंदराज आंबेडकर म्हणाले की, परदेशातल्या लाेकांना आपण देशात आणून अजून बेराेजगारी वाढवणार आहाेत का? आसाममध्ये २० लाख घुसखाेर असतील तर त्यात १३ लाख हिंदू असतील. हे घुसखाेर दलित, आदिवासी असतील. ते कधीच पुरावा देऊ शकत नाहीत. सरकार आज जे काही देशात आणू पाहत आहे ते दुर्दैवी आहे. यातून काहीच साध्य होणार नसून त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धाेका आहे. त्यामुळे सरकारने हे सर्व बंद करावे, असे स्पष्ट मतही आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. एका प्रश्नाच्या उत्तरात आनंदराज म्हणाले की, २०१४ मध्ये मोदी सरकार जेव्हा सत्तेवर आले होते तेव्हा आम्ही देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत होतो. मात्र ते धुळीस मिळाले आहे. जीडीपी रसातळाला गेला आहे. त्यामुळे सीएए आणि एनआरसी अशातून देशाचा कोणताही विकास होणार नाही, असे आनंदराज म्हणाले.
सत्तेचे राजकारण करू
रिपब्लिकन सेना आता सत्तेचे राजकारण करणार आहे. त्यासाठी आम्ही जे जे मित्रपक्ष म्हणून जवळ येऊ पाहतील किंवा मित्र असतील त्यांच्यासोबत सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे अकोला येथे आंबेडकरी विचारांच्या लोकांचे संघटन केले, तोच पॅटर्न आम्ही राज्यात राबवू, असे आंबेडकर यांनी सांगितले.
समाजात आले नैराश्य
आंबेडकरी समाजाला चेतना देण्यासाठी आंबेडकरी समाजाला न्याय देणारी आमची संघटना आहे. जो आंबेडकरांचे विचार मानतो तो आंबेडकरवादी असे आम्ही मानतो. त्यामुळे आमच्या संघटनेत या विचारांच्या लोकांचे आम्ही स्वागतच करू. आंबेडकरी समाजात एक नैराश्य आले आहे. ते दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सरकारला फटका बसणार :
सीएए आणि एनआरसीचा भाजप सरकारला मोठा फटका बसणार, असे आनंदराज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर सांगितले. भाजपकडे आता राम मंदिराचाही मुद्दा राहिला नाही. त्याचाही फटका बसेल, असे आनंदराज म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.