प्रतिबंध / टीव्ही सेट्स आणि फर्निचरच्या आयातीवर सरकार बंदी घालणार

  • टीव्ही संचाच्या किमतीत १० ते १५ टक्के हाेऊ शकते वाढ
  • मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पावले उचलत आहे

दिव्य मराठी नेटवर्क

Feb 14,2020 09:31:00 AM IST

नवी दिल्ली - देशातील मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी केंद्र सरकार टीव्ही संच आणि फर्निचरला प्रतिबंधित श्रेणीत टाकण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. यामुळे देशात अनावश्यक वस्तूंच्या आयातीत कपात हाेईल आणि व्यापार तूट कमी हाेऊ शकते. मात्र, निर्बंध लावल्याने टीव्ही संचाच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ हाेऊ शकते. सूत्रांनुसार, इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व वाणिज्य मंत्रालय अनावश्यक वस्तूंच्या आयातीस प्रतिबंधित श्रेणीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर संयुक्त चर्चा करत आहे. सध्या यामध्ये टीव्ही सेट आणि फर्निचरचा समावेश आहे. प्रतिबंधित श्रेणीत दाेन्ही वस्तूंचा समावेश झाल्यावर आयातदारास आयातीसाठी वाणिज्य मंत्रालयाच्या विदेशी व्यापार महासंचालनालया(डीजीएफटी)कडून परवाना घ्यावा लागेल. याच्याशी संबंधित आयातदारास जास्त आयात शुल्काशिवाय विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतील. सध्या या श्रेणीत विविध हेलिकाॅप्टर, विमान, हाॅट एअर बलून, शस्त्र, पाळीव प्राणी, जिवंत पशू, टायर व बॅटरी स्क्रॅप आदींचा समावेश आहे. यासाेबत टीव्ही सेटची श्रेणी म्हणजे कमी किंमत किंवा जास्त किमतीच्या आधाराचा प्रस्तावात उल्लेख नाही. निर्यातदारांची संघटना फियाेने या मुद्द्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

डब्ल्यूटीआेसह करारावरही परिणाम हाेऊ शकताे

स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय समन्वयक अश्वनी महाजन म्हणाले, व्यापारयुद्ध आणि काेराेना विषाणूमुळे जगात ज्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली, ते पाहता देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंगला प्राेत्साहन देणे याेग्य पाऊल आहे. मात्र, काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक व्यापार संघटने(डब्ल्यूटीआे)शी भारताचा करार झाल्यामुळे तसे करणे कठीण हाेईल. डब्ल्यूटीनुसार, विशिष्ट कारणामुळे आयातीवर निर्बंधाच्या श्रेणीत टाकले जाऊ शकत नाही.


७ हजार काेटी रुपयांचे टीव्ही सेट हाेतात आयात

२०१८-१९ मध्ये सुमारे ७ हजार काेटी रुपयांचे टीव्ही सेट आयात केले हाेते. यामध्ये सर्वात जास्त चीनकडून ३९०० काेटी रुपयांची आयात झाली हाेती. यानंतर व्हिएतनामकडून ३२.७ काेटी डाॅलर, मलेशियातून १०.९ काेटी डाॅलर व द. काेरिया, इंडाेनेशिया, थायलंड आणि जर्मनीतून १.०५ काेटी डाॅलरचे टीव्ही सेट आयात केले हाेते. मात्र, भारताच्या एकूण आयातीबाबत सांगायचे झाल्यास ती सुमारे ३५ लाख काेटी रु.हाेती. सात लाख काेटींची आयात अनावश्यक वस्तूंची हाेती.


रिफाइंड आॅइलपासून ट्रान्समीटरवर निर्बंध लादले

भारताने मलेशिया आणि दक्षिण पूर्व देशांतून रिफाइंड पामतेलाच्या आयात प्रतिबंधित श्रेणीत नुकतेच टाकले आहे. अशा पद्धतीमुळे ट्रान्समीटर, रिफरबिश्ड इलेक्ट्राॅनिक्स आयटम व कम्युनिकेशन डिव्हाइस आदीही निर्बंधात ठेवले आहे.


उद्योगाचा आकार 85,000 कोटी रुपयांचा

सध्या देशात इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा आकार ८५००० कोटी रुपयांचा आहे. बहुतांश इलेक्ट्रॉनिक्स उपकरण घटकांची आयात केली जात होती.
-कमल नंदी, अध्यक्ष, सीईईएएमए

X