political / आर्थिक मंदीला सरकारची धोरणेच कारणीभूत : खा. सुळे

संवाद यात्रेनिमित्त परभणीत घेतला डॉक्टरांचा मेळावा

प्रतिनिधी

Sep 10,2019 08:18:00 AM IST

परभणी : जीएसटी, नोटाबंदीसह सरकारने गेल्या पाच वर्षांत राबवलेल्या आर्थिक धोरणांचा परिणाम सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये दिसून येऊ लागला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी सोमवारी(दि.नऊ) परभणीत केला.
संवाद यात्रेनिमित्त येथील शारदा महाविद्यालयात आयोजित डॉक्टरांच्या संवाद मेळाव्यानिमित्त खा.सुळे उपस्थित झाल्या होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.फौजिया खान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्षा भावना नखाते, सोनाली देशमुख, प्रा.किरण सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. खा.सुळे म्हणाल्या, संवाद दौऱ्याच्या निमित्ताने समाजातील विविध स्तरातील व्यावसायिकांशी चर्चा करून ग्राऊंड रियालिटी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आर्थिक मंदी व त्यातून निर्माण होत असलेली बेरोजगारी हे प्रश्‍न मोठे गंभीर रूप धारण करीत आहेत. याला कारण सरकारच्या मल्टिपल मेकिंग पॉलिसीच कारणीभूत आहेत. एकीकडे पैसा आहे म्हणून सांगणारे सरकार रस्त्याचे कामे मात्र पूर्ण करू शकत नाहीत. हजाराे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातबाजीतच अडकून पडले आहे. जनतेकडून कराच्या रूपाने वसूल झालेला पैसा हा जाहिरातबाजीवर उधळला जात आहे. जाहिरातबाजी करायची असेल तर संघटनेच्या पैशांतून करावी, असे खा.सुळे म्हणाल्या.


पक्षांतराची चार कारणे
राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भाजपमध्ये जाणारी मंडळी केवळ चार कारणामुळेच प्रवेश करीत आहेत. ईडी, सीबीआय, बँक व डबघाईस आलेले कारखाने आदी कारणामुळेच ही मंडळी पक्षांतर करीत आहेत. परंतु मतदारांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी आहे, असेही खा.सुळे म्हणाल्या.

X
COMMENT