आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांनी सर्व संकेत पायदळी तुडवत फडणवीसांना दिली शपथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा : भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला आहे, तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी संकेत, पद्धती याला हरताळ फासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केला.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कराड येथील कृष्णा - कोयनेच्या प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी साेमवारी शरद पवार कराड येथे आले होते. पवार म्हणाले, महाराष्ट्रात बहुमत नसतानाही भाजपने सरकार स्थापन केले आहे. राष्ट्रवादीचा भाजपला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी अजिबात पाठिंबा नाही. 

विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व चित्र स्पष्ट होईल. अजित पवार यांच्या बंडामागे माझा हात नाही. मी त्यांच्या मागे असल्याचा भाजप खोटा प्रचार करत आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. भाजप नेहमीच आम्ही इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आता जे महाराष्ट्रात भाजपने केले ते हेच वेगळेपण आहे का ? असा टोलाही पवार यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र उभा केला. देशातील एक महत्त्वपूर्ण राज्य म्हणून महाराष्ट्र उभा केला तो तसाच राहावा याच अपेक्षा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी आहेत, असेही ते म्हणाले.

अजितदादांचा निर्णय वैयक्तिक

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्याकडे बहुमत आहे. सभागृहात तेच दिसेल. अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याच्याशी संबंध नाही. शपथविधी झाल्यावर पदभार स्वीकारणे हे रुटीन आहे. फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड वैध आहे की नाही यावर भाष्य करणार नाही.

सत्तास्थापनेचा प्रकार भारतीय घटनेचा खून

सोलापूर : सत्तास्थापनेचा झालेला प्रकार हा भारतीय घटनेचा खूनच आहे. ज्या पद्धतीने शपथविधी झाला, ते पाहता मंत्रिमंडळाची बैठक झाली की नाही, याबाबत साशंकता आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ते म्हणाले,'राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीची मंजुरी आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपतींची सही लागते. घटनात्मक निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. राजवट उठवण्यासाठी त्याची आवश्यकता होतीच. पण, सकाळी सात वाजता शपथविधी झाला, याचा अर्थ राष्ट्रपतींनी पहाटेच सही केली असावी? असा संशय आहे.

 

बातम्या आणखी आहेत...