आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती भवनात साध्या पद्धतीने पार पडणार शपथविधी सोहळा, 6 हजार पाहुणे घेणार जेवणाचा आस्वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरुवारी सांयकाळी राष्ट्रपती भवनातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा शपथविधी समारंभ असेल, ज्यामध्ये सुमारे 6 हजार पाहुण्यांचा समावेश आहे. 

 

नरेंद्र मोदींना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. पण पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांच्या इच्छेनुसार, हा समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. हा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनातील फोरकोर्टमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी फक्त राष्ट्राध्यक्षाच्या गार्ड ऑफ ऑनरचा सोहळा पार पडतो. तसेच, हा शपथविधी 'दरबार हॉलमध्ये' नाही, तर फॉरकोर्टमध्ये पार पडणार आहे कारण, दरबार हॉलमध्ये फक्त 500 लोकांची बसण्याची व्यवस्था असते. 

 

चौथ्यांदा फॉरकोर्टमध्ये होणार शपथविधी 
भारताचे 8 वे पंतप्रधान चंद्रशेखर असे पहिले पंतप्रधान होते, ज्यांचा 1990 साली फोरकोर्टमध्ये शपथविधी झाला होता. त्यानंतर 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा या ठिकाणी शपथविधी पार पडला होता आणि तिसऱ्या वेळेस 2014 मध्ये नरेंद्र मोदींचाही शपथविधी फॉरकोर्टमध्येच पार पडला होता. 2014 मध्ये मोदींच्या शपथविधीसाठी सार्क देशातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यादरम्यान जवळपास 4 हजार पाहुणे या समारंभात सहभागी झाले होते. 

 

व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था
या सोहळ्यात आलेल्या लोकांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच राष्ट्रपती भवनातील खास वरणाचाही यात समावेश आहे. या वरणाचे वैशिष्ट म्हणजे याला शिजण्यासाठी तब्बल 48 तास लागतात. मंगळवारपासूनच याची तयारी करण्यात येत आहे.

 

सायंकाळी 7 वाजता सुरू होणार शपथविधी 
2014 मध्ये सायंकाळी 6 वाजता शपथविधी समारंभ सुरू झाला होता. त्यासाठी 4 वाजेपासून पाहुण्यांचे राष्ट्रपती भवनाकडे आगमन सुरू झाले होते. पण त्यावेळी गरम उन्हाच्या झळ्यामुळे पाहुण्यांना खूप त्रास झाला होता. यादरम्यान सुरक्षेच्या कारणामुळे पाण्याची बाटली सुद्धा आत नेण्यास परवानगी नव्हती. म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन यावेळेस हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.