आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्षे नासली, कांदा कुजला, भातही सडला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : २,५९५ गावांना फटका, १.४० लाख शेतकऱ्यांचे नुकसान - Divya Marathi
नाशिक : २,५९५ गावांना फटका, १.४० लाख शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहेत. राज्यातील ३२५ तालुक्यांना या पावसाचा फटका बसला असून १३९.८८ लाख हेक्टरपैकी तब्बल ५४ लाख २२ हजार म्हणजे ३८.९४ टक्के क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक २२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान मराठवाड्यात, तर नाशिक विभागात १६ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचे विदारक चित्र अाहे.

नाशिक : २,५९५ गावांना फटका, १.४० लाख शेतकऱ्यांचे नुकसान
निर्यातीच्या माध्यमातून कोट्यवधींची परकीय गंगाजळी आणणारी सायखेडा, सटाणा तालुक्यातील द्राक्षबागा वा भाताचे कोठार समजले गेलेल्या घोटी परिसरातील भातशेती ते कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची नागली अशा जिरायती, बागायती सर्व प्रकारची नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार हेक्टरवरील पिके अवकाळी पावसात उद्ध्वस्त झाली आहेत. यापैकी १ लाख ९६ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असले तरी द्राक्ष बागांसारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या पिकांचे झालेले नुकसान शासकीय भरपाईच्याही अावाक्याबाहेरचे दिसते आहे. नुकसानीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.


सटाणा आणि कळवण या भागातील बागायतदारांचा निर्यातक्षम माल या पावसात पूर्णपणे सडला आहे. आठवडाभर पाऊस सुरू राहिल्याने स्थानिक बाजार, बेदाणे किंवा वाईन यासाठीही तो उपयोगात न आल्याने एकरी ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. पीक कर्जाच्या मागील थकबाकीमुळे खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांनी दिलेल्या पीक कर्जात ५० टक्क्यांनी घट झाली होती. परिणामी ५०% कर्ज खाजगी सावकारीतून उचलली गेल्याने त्यांनाही विमा संरक्षण मिळालेले नाही. ज्यांनी विमा काढला आहे, त्यांनाही अटींची पूर्तता करण्यासाठी कसरती कराव्या लागत आहेत.

नेत्यांचे दौरे आणि पाहणीचे देखावे
गेल्या चार दिवसांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री गिरीश महाजन, आरपीआय नेते रामदास आठवले आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे केले. पवार यांनी पाहणीसोबतच सरसकट पंचनामे व भरपाई देण्याची मागणी केली आहे. खोत यांच्या दौऱ्यातून फोटोसेशन पलीकडे शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडले नाही. आदित्य ठाकरे यांचा ५८ गाड्यांच्या ताफ्यासह झालेला दौरा पाहणी कमी आणि शक्तिप्रदर्शन अधिक असाच ठरला. पाच दिवस उशिरा झालेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यातूनही शेतकऱ्यांच्या हाती ठोस काहीही मिळाले नाही.

नंदुरबार : ८४० हेक्टर क्षेत्र बाधित
अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ८४० हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील अक्राणी, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार तालुक्यांतील २८४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला अाहे. त्यात एक हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.


कृषी, महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येत्या शुक्रवारपर्यंत पूर्ण गावांचा पंचनामा करण्यात येऊन अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. नंदुरबार ३६५ हेक्टर, नवापूर १२२ हेक्टर, शहादा ४९६ व अक्राणी १२० हेक्टर शेती बाधित झाली आहे. या सर्व पीक क्षेत्रात साधारणपणे ३३ टक्केपेक्षा अधिक पिके खराब झाली आहेत.


मका, बाजरी, कापूस, मूग, उडीद या पिकांना मोठा फटका बसला आहे. ऊसतोडीवर परिणाम झाल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगामदेखील उशिराने सुरू होणार आहे. अक्कलकुवा व तळोदा हे दोन तालुके अतिवृष्टीच्या नुकसानीतून सुदैवाने वाचले आहेत.
छाया : अशोक गवळी, नाशिक

जळगाव : ४ लाख हेक्टरवर पंचनामे
उत्तर महाराष्ट्रालाही अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे ६ अाॅक्टाेबरअखेर ४ लाख ३६ हजार ४४० हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले अाहेत.उर्वरित पंचनामे १० अाॅक्टाेबरपर्यंत पूर्ण हाेतील, असे अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.


जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, ज्वारी, साेयाबीन, उडीद, मूग, बाजरी व फळबागांचे अताेनात नुकसान झाले अाहे. जिल्ह्यात या खरिप पिकांच्या लागवडीखालील एकूण ६ लाख १३ हजार ११ हेक्टर क्षेत्र अाहे. या क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे महसूल, कृषी व जिल्हा परिषद या यंत्रणांमार्फत पंचनामे करण्यात येत अाहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९६ हजार ७२२ शेतकऱ्यांच्या एकूण ४ लाख ३६ हजार ४४० हेक्टरवरील पंचनामे ६ अाॅक्टाेबरपर्यंत पूर्ण झाले. ६ अाॅक्टाेबर राेजी १ लाख ५६ हजार १४० हेक्टरवरील पंचनामे करण्यात अाले. पंचनामा अावश्यक नसलेले क्षेत्र ५९ हजार ६४ हेक्टर एवढे अाहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण ३ लाख ४० हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान
1714 गावांमधील जिरायती शेती उद्ध्वस्त
1.18 लाख 776 शेतकऱ्यांना फटका
99 हजार 641 हेक्टर जिरायतचे नुकसान
881 गावांमधील फळबागांना फटका
22,736 बागायती शेतकऱ्यांचे नुकसान
19,705 हेक्टर बागांवर परिणाम

धुळे : ३.५ लाख हेक्टर पिकांचे नुकसान, कपाशीला तडाखा
अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे धुळे जिल्ह्यात ३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले अाहे. सर्वाधिक फटका कपाशीला बसला अाहे. त्याशिवाय बाजारी, ज्वारी, मका, साेयाबीन अादी पिकांचे नुकसान झाले अाहे. ५५ टक्के पंचमान्यांचे काम पूर्ण झाले अाहे.


धुळे जिल्ह्यात ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली हाेती. याशिवाय बाजरी, ज्वारी, मका, साेयाबीन, तूर, भात, कांदा अादी पिकांची लागवड झाली हाेती. शेतांत महिन्यापासून पाणी साचलेले असल्याने पिके पिवळी पडली, कपाशीची बाेंडे अाेली झाली. बाजरी, मक्याच्या कणसाला काेंब फुटले अाहेत. धुळे तालुक्यात सर्वाधिक ७०% नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात अाले अाहेत. ८ नाेव्हेबरपर्यंत नुकसानीचे पंचनामे करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या गेल्या अाहेत. पंचनामे दाेन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. यंदा जिल्ह्यात ७६,८०२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला अाहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून नुकसानीबाबत विमा कंपनीकडे अर्ज केलेले अाहेत.

६२३ गावांतील अडीच लाख शेतकऱ्यांना आपत्तीचा फटका
धुळे जिल्ह्यातील ६२३ गावातील २ लाख ६० हजार ७७६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले अाहे. त्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांत ४६९ गावांतील १८ हजार ६२१ शेतकरी, ३० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्यांमध्ये ६२३ गावांतील २ लाख ४२ हजार १५५ शेतकऱ्यांचा समावेश अाहे.

मराठवाडा : ९० टक्के पिके हातातून गेली, २९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे खरिपाची ९० टक्के पिके हातून गेली आहेत. ४८ लाख हेक्टरपैकी २९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील १४०२ बाधित गावांत ५ लाख ९५,५०० हेक्टरावरील खरिपाचे नुकसान झाले आहे. यातील ४४५ गावांतील पिकांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले आहेत. ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले अाहे. हिंगाेली जिल्ह्यात २ लाख १३,७२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांचे ४ लाख ३३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले अाहे. नांदेड जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर तर परभणी जिल्ह्यात ३ लाख २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात २ लाख १७,८०३ हेक्टरवरील पिकांचे ३२६ काेटींचे नुकसान झाले अाहे. अाैरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यातही अंदाजे अडीच लाख हेक्टरवरील पिके वाया गेली अाहेत.

सर्वाधिक नुकसान साेयाबीनचे
मराठवाड्यात नगदी पीक म्हणून साेयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अाहे. एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रात साेयाबीन या एकट्या पिकाचा वाटा ६० ते ७० टक्के इतका येताे. एेन साेयाबीन काढणीच्या काळातच पाऊस झाल्याने हे पीक पुरते हातून गेले अाहे. शेंगांना जागीच काेंब फुटले. त्या पाठाेपाठ मका, तूर, कापूस या पिकांचे माेठे नुकसान झाले अाहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकच जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान २ ते ४ काेटींच्या दरम्यान अाहे.

पश्चिम महाराष्ट्र : १.३६ लाख हेक्टरवरील पिके झाली जमीनदाेस्त
पुणे : 'अवकाळी' पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ३६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन या खरीप पिकांसह भाजीपाला, फळबागांचा समावेश अाहे. नाेव्हेंबरच्या पहिल्या अाठवड्यात पंचनामे सुरू असताना पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक वाढले आहे.


पुणे विभागातील ५८ पैकी ५१ तालुक्यांत नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू अाहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला अाहे तेथील शासकीय पंचनामा गृहीत धरून विमा कंपन्या भरपाई देणार अाहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने नुकसानीचे प्रमाण काही अंशी कमी असल्याचे विभागीय अायुक्त डाॅ. दीपक म्हैसकर यांनी सांगितले. सातारा व सोलापूर जिल्ह्यात मात्र फळबागांचे माेठे नुकसान झाले. डाळिंबाला लागलेली फळे गळून पडली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगाेला, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण भागात माेठे नुकसान झाले. बारामती, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस तालुक्यात द्राक्षबागांना माेठा फटका बसला.

पुणे विभागात पिकांचे नुकसान
सांगली ६५,२६७ हेक्टर
सोलापूर ३६,३४५ हेक्टर,
पुणे २१,६८१ हेक्टर,
सातारा ११,८०० हेक्टर
कोल्हापूर १,५५ हेक्टर
 

नागपूर विभाग : ९० हजार हेक्टरला बसला फटका; कापूस, सोयाबीन व धानाचे नुकसान
अवकाळी वा परतीच्या पावसामुळे नागपूर िवभागात ९०,७३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती िवभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिली. सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी सविस्तर पंचनामे करण्यासोबतच रब्बी हंगामाची तयारी करण्यास सांगितल्याचे भोसले यांनी सांगितले.


सर्वाधिक नुकसान कापूस, सोयाबीन व धानाचे झाले आहे. सोंगून ठेवलेले सोयाबीन पाण्यात सडले तर गंजी लावलेल्या सोयाबीनला अंकुर फुटल्याने वाया गेले. फुललेली बोंडे ओली झाल्याने व गळून पडल्याने कापसाचे तर पाणी साचून सडल्यामुळे तुरीचे नुकसान झाले. नागपूर विभागात एकूण २,४६१ गावातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात ४६३८६५.३०, वर्धा ४०२३१६, भंडारा १,७७,५१२, गोंदिया १,९१,०१०, चंद्रपूर ४,१०,८८६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १,८३,३३४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्याच्या आतील ४७,९२५.७४ हेक्टर तर ३३ टक्क्यांच्या वर ४२,८०५.५४ असे एकूण ९०,७३१.२८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

अमरावती : ३.५ लाख हेक्टर सोयाबीन मातीमोल
यंदा अमरावतीसह पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे ३.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन तसेच ३० हजार हेक्टरवरील संत्र्याचे नुकसान झाल्याने आधीच बेजार असलेला शेतकरी आता डोक्याला हात लावून बसला आहे. कापूस, संत्री, साेयाबीन पिके शेतातच सडली अाहेत. एरवी सरासरी ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळणाऱ्या साेयाबीनचे दर अाता १५०० रुपयांपर्यंत घसरले अाहेत. अमरावती विभागात ६ लाख हेक्टरच्या वर सोयाबीनची विभागात पेरणी झाली त्यापैकी ३.५ लाख हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोयाबिन सडले असून काही ठिकाणी किड लागली आहे तर काही ठिकाणी सोयाबीनला अंकुर फुटले आहेत. त्यामुळे त्याचा दर्जा खालावला आहे. एवढेच नव्हे तर २० हजार हेक्टरवरील संत्राही गळाला आहे.