आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचे हात न्यायाधीशांच्या घरापर्यंत, खिडकीचे ग्रील तोडून रोकड लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद/ उमरगा - एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना आता जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.उस्मानाबादेत दररोज वेगवेगळ्या भागात चोरीचे सत्र सुरू आहे. ग्रामीण भागातही जनावरे, धान्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. उमरगा परिसरात सोमवारी शिक्षकाला भरदिवसा लुटल्याची घटना घडल्यानंतर आता थेट न्यायाधिशाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका होऊ लागली आहे.


उमरगा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अाहेत. गेल्या महिनाभरात घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांवरून हे स्पष्ट होत आहे. शहरातील श्री दत्त नगर येथील न्यायाधीशाच्या निवासस्थानात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना मंगळवारी (दि.२७) उघडकीस आली. न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर महम्मद ताहेर बिलाल वास्तव्यास अाहेत. त्यांच्या घरातील इतर सदस्य नांदेड येथे लग्न कार्यासाठी गेले होते. न्यायाधीश महम्मद बिलाल सोमवारी (दि. २६) रात्री जेवण झाल्यावर निवासस्थानाच्या मुख्य हाॅलमध्ये झोपले होते. मंगळवारी (दि.२७) रात्री बारा ते पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला.

 

कपाटात ठेवलेले दोन हजार रुपये व शर्टच्या खिशातील अठराशे रूपये, अशी तीन हजार आठशे रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी पहाटेच्या वेळी न्यायाधीश उठले असता बेडरुमचा दरवाजा उघडा, कपाटातील व ड्रेसिंग टेबलचे ड्राव्हर उघडे व मधील साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले तसेच रूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरी केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरिक्षक विशाल भोसले करीत आहेत. एक महिन्यापूर्वी शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असलेल्या नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे यांच्या घरातील बेडरुममधील कपाट फोडून कपाटातील जवळपास रोख रक्कमेसह २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केलेल्या चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालेले नाही.

 

दहा दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यासमोर हाकेच्या अंतरावरील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह एक लाख २५ हजार, ७८० रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत इंदिरा चौकातील एक भांडीचे दुकान व समोरील पान टपरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी मुळज-गुगळगाव रस्त्यावर दोघेजण तोंडाला रूमाल बांधून विना नंबरच्या मोटार सायकलवरून येत चाकूचा धाक दाखवून शिक्षकाला लुटून बारा तासाच्या आत शहरातील बालाजी नगरातील एका घराच्या मागील दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान चोरट्यांना लहान मुलांने हटकल्याने चोरटे पसार झाले. पुन्हा चोवीस तासाच्या आत न्यायाधीशाच्या घरी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे. दरम्यान याच रात्री चालुक्य काॅलनी परिसरात शेजारी जागी झाल्याने एका शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न फसला.


पोलिसांची निष्क्रियता, वेळीच घटनांना पायबंद घालण्याची गरज
जिल्ह्यात तसेच शहरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यावर आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला अपयश येत आहे. एखादी घटना घडलीच तर त्याचा मागमूस लागत नसल्याने आता तक्रारदारही तक्रार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या सामान्य वाटणाऱ्या घटनाना वेळीच आवर नाही बसल्यास भविष्यात गंभीर प्रश्न उभे रहाण्याची शक्यता आहे

बातम्या आणखी आहेत...