Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | the heaviest woman in Asia has reduced the weight of 214 kg in 4 years

आशियात सर्वाधिक वजनदार असलेल्या मुंबईतील महिलेने ४ वर्षांत घटवले तब्बल २१४ किलो वजन

विशेष प्रतिनिधी | Update - May 09, 2019, 10:00 AM IST

वयाच्या सहाव्या वर्षापासून वजन वाढायला सुरुवात, सोळाव्या वर्षी होते ३०० किलो

 • the heaviest woman in Asia has reduced the weight of 214 kg in 4 years

  मुंबई - पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या ४२ वर्षांच्या ३०० किलो वजनाच्या अमिता राजानी या आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या महिला होत्या. मात्र त्यांनी ४ वर्षापूर्वी बॅरिअॅट्रिक सर्जरी केली आणि तब्बल २१४ किलो वजन कमी केले. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनीच ही माहिती दिली.


  अमिता राजानी यांचे सुरुवातीला वजन सामान्य म्हणजे ३ किलो होते. पण वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. हळू हळू त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नव्हते. चालण्यापासून सगळ्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना कुटुंबियांच्या मदतीची गरज लागत असे. जास्त वजन असल्याने कोलेस्टरॉलची पातळी असंतुलित झाली होती, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाला होता, टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा सपोर्ट द्यावा लागत असे. चार वर्षापूर्वी ऑपरेशन करण्यापूर्वी आठ वर्षे त्या खाटेला खिळून होत्या.


  २०१५ साली त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वतःहून चालू लागल्या. २०१७ साली अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले.

  लिम्का बुकात विक्रमाची नोंद करण्याचे प्रयत्न
  शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे आणि त्यांना आहाराचे पथ्य पाळण्यास सांगितले असून अमिताची केस लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नांत आहोत, अशी माहिती डॉ. शशांक शाह यांनी दिली.

Trending