आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटीच्या इतिहासात भारतीय गाेलंदाजीची अव्वल कामगिरी; १७ च्या सरासरीने विकेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा क्लीन स्वीप जवळपास निश्चित केला. यासाठी टीम इंडियाच्या वेगवान गाेलंदाजांचे माेलाचे याेगदान ठरले आहे. भारताच्या वेगवान गाेलंदाजांनी कसाेटीच्या इतिहासातील सर्वाेत्तम सरासरीने विकेटची कमाई केली. या गाेलंदाजांनी या कसाेटीत आतापर्यंत १० विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांवर धुव्वा उडाला. त्यानंतर फाॅलाेआॅनच्या नामुष्कीला सामाेरे जात असलेल्या आफ्रिकेची दुसऱ्या डावातही दमछाक झाली. त्यामुळे आफ्रिकेने तिसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवसअखेर साेमवारी दुसऱ्या डावात ८ बाद १३२ धावांची खेळी केली. याच सुमार खेळीमुळे आफ्रिकेवर आता डावाने पराभवाचे सावट निर्माण झाले. हेच टाळण्यासाठी आफ्रिकेला आता २०३ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारतीय संघ पहिल्या क्लीन स्वीपपासून दाेन विकेटने दूर आहे.   

आफ्रिकेने कालच्या २ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्याच सत्रातील पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर उमेश यादवने कर्णधार डुप्लेसिला(१) बाद केले. १६ धावांवर तीन विकेट पडल्यानंतर हमजा (६२) आणि बावुमाने (३२) चाैथ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी रचली. 
 

भारतीय गाेलंदाजांनी एकाच दिवशी १६ + विकेट घेतल्या
कसाेटीच्या इतिहासात भारतीय गाेलंदाजांनी फक्त तीन वेळा घरच्या मैदानावर एकाच दिवशी १६+ विकेट घेण्याचा पराक्रम गाजवला. टीमने २०१८ मध्ये बंगळुरूत अफगाणिस्तानविरुद्ध २०, तसेच १९५२-५३ मध्ये दिल्लीत पाकविरुद्ध १७ विकेट घेतल्या हाेत्या. आफ्रिकन संघाने १७ वर्षांनंतर एकाच दिवशी १६ विकेट गमावल्या आहेत.
 

उमेश यादवने घेतल्या पाच डावांत सलग ३+ विकेट
वेगवान गाेलंदाज उमेश यादवने आपल्या घरच्या मैदानावर शेवटच्या पाच डावांत सलग तीनपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. असे करणारा ताे पहिला भारतीय वेगवान गाेलंदाज ठरला. काेहलीने कर्णधाराच्या भूमिकेत आठव्यांदा प्रतिस्पर्धी टीमला फाॅलाेआॅन दिला. यासह ताे पहिला कर्णधार ठरला. त्याने अझहरला (७ वेळा) मागे टाकले.
 

१२ खेळाडू फलंदाजी करणार
आफ्रिकेचा सलामीवीर एल्गर (नाबाद १६)  रिटायर्ड हर्ट झाला. कन्कशन नियमामुळे त्याच्या जागी ब्रुयनला संधी मिळाली. त्यामुळे कसाेटीच्या इतिहासात दुसऱ्यांदा एक टीमचे १२ खेळाडू फलंदाजी करतील. यापूर्वी यंदा ऑगस्टमध्ये भारताविरुद्ध कसाेटीत विंडीजचा ब्राव्हाे जखमी झाल्याने ब्लॅकवूडने फलंदाजी केली.