आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिडे एक्स्प्रेसच्या चाकाला तडा, गार्ड आणि चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने अनर्थ टळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील नांदगाव ते पिंपरखेड स्थानकादरम्यान बरौनी - लोकमान्य टिळक टर्मिनस समर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसच्या ब्रेकर कोचच्या चाकाला तडा गेल्याची घटना रविवारी सकाळी घडली.अपघातग्रस्त कोच बाजूला करुन गाडी मुंबईकडे रवाना झाली. यामुळे सचखंड, महानगरी, गोवा, झेलम, दुरांतो, पटना सुपर, छपरा सुपरफास्ट, अलाहाबाद मुंबई, मंडूआहिड पुणे हॉलिडे स्पेशन या गाड्यांना ३ तासांचा विलंब झाला.  


ग्रीष्मकालीन विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसचे रविवारी सकाळी ८:१० वाजता बी-१५ या कोचचे चाक तुटले. शेवटून दुसरा कोच असल्याने यावेळी झालेला आवाज एक कोच पलीकडे असलेल्या गार्ड कॅबिनमध्ये ऐकू गेला. यावेळी गार्ड व रेल्वेचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने रेल्वे त्वरीत थांबली. कोचमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मनमाड येथून आलेल्या क्रेनच्या साहाय्याने बी-१५ व त्यामागचा कोच यावेळी स्थानक प्रमुख अमरचंद अग्रवाल, सिनियर सेक्शन इंजिनिअर मनोज कुमारसिंग, रजनीश यादव यांच्या देखरेखीत ११:३५ मिनिटांनी नांदगाव यार्डात आणण्यात आला. अपघातग्रस्त कोचमधील १३० ते १४० प्रवाशांना एक्स्प्रेसच्या इतर कोचमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. दोन कोच वगळता एक्स्प्रेसला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. दुपारी दीड वाजता अप मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 
सलग दुसऱ्या दिवशी विलंबाचा फटका : मध्य रेल्वेच्या अप मार्गावर शनिवारी खंडवा ते भुसावळदरम्यान विविध ठिकाणी तांत्रिक कार्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. तसेच इटारसी व भोपाळ दरम्यानही ब्लॉक असल्याने उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या सात तर सुरतकडे जाणारी एक अशा आठ एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावल्या. रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही अपघातामुळे सहा एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावल्या. यामुळे दररोज अपडाऊन करणाऱ्या नोकरदारांनी संताप व्यक्त केला. 

 

सचखंड, दुरांतोसह अन्य गाड्यांतील प्रवाशांचा संताप
छपरा सुपरफास्ट एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या भुसावळ स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या. भुसावळ यार्डात अलाहाबाद मुंबई हॉलिडे स्पेशल तसेच मंडूआहिड पुणे हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस थांबवण्यात आल्या होत्या. तर अन्य गाड्या जळगाव, चाळीसगाव आदी स्थानकांवर थांबवण्यात आल्या. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. फलाटावर गाडी थांबून असल्याने नेमके कारणही प्रवाशांना सांगितले जात नव्हते.  

बातम्या आणखी आहेत...