आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेनेच्या वचननाम्यातील एकही वचन पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा केला नाही. राज्यात एक कोटी १८ लाख गरीब असताना फक्त एक लाख लोकांना शिवभोजन दिले जात आहे. जेलमधील कैद्यांवर प्रत्येक दिवशी ८८ रुपये खर्च केले जातात. राज्यातील या गरिबांचे दिवसाचे उत्पन्न १३ रुपयेही नाही, त्यांना दहा रुपयात शिवभोजन देणार आहेत. गरिबांनी दहा रुपये रोज कुठून आणायचे, असा सवाल माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुनगंटीवार यांनी केली. राज्याच्या विकास दरावर देशाचा विकास दर ठरतो, मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिलीच ओळ चुकीची म्हणत केंद्राचा विकास दर कमी झाल्याने राज्याचा विकास दर कमी झाल्याचे म्हटले होते. सरकारचा हा अर्थसंकल्प नसून केंद्राकडे केलेले मागणीपत्र आहे, अशी टीका करून हा संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प नसून केवळ पाच जिल्ह्यांचा अर्थसंकल्प आहे अशी टीका त्यांनी केली.
राज्याचा राजकीय नकाशा ३६ जिल्ह्यांचा आहे, परंतु आर्थिक नकाशा मात्र पाच जिल्ह्यांचाच दिसत आहे. कोकणाला काही दिले, नागपूरचा निधी कमी केला आणि विदर्भ, मराठवाड्यालाही काही दिले नाही. त्यांनी केवळ राज्यातील जनतेलाच अर्थसंकल्पात फसवले असे नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्यामुळे हे सत्तेवर आले त्यांनाही फसवले आहे असा आरोप करून विकासकामांवरील स्थगित्या उठवा, अशी मागणीही त्यांनी या वेळी बोलताना केली.
शिवसेनेला फसवल्याची कबुली
शिवसेनेला आम्ही फसवले ही चूक केली असे उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी बोलताना काढले आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेला भाजपने फसवल्याची कबुलीच दिली. आमच्या चुकीचा तुम्ही फायदा उचलला, परंतु आम्ही ही चूक सुधारू आणि तेव्हा आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही आणि स्थगितीचेही राजकारण करणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.