आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपरिहार्यतेचे 'राज'कारण!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव यांना नरेंद्र मोदी नावाचा उदय जाणवला नव्हता, तेव्हा राज ठाकरे गुजरात मॉडेलच्या प्रेमात होते. शरद पवार नावाचे वलय उद्धव यांना समजले नव्हते, तेव्हा राज त्यांच्याशी प्रकट संवाद करत होते. मोदींना सत्तेतून बाहेर हाकलणे शक्य असल्याचा अंदाजही उद्धव यांना नव्हता, तेव्हा राज 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत महाराष्ट्र पिंजून काढत होते. राज हे द्रष्टे खरेच, पण त्यांनी भाकीत केल्याप्रमाणे घडत गेले, तेव्हा त्याचे पहिले लाभार्थी मात्र उद्धव ठरले. राज यांची सकाळ झाली, तोवर वेळ कधीच उलटून गेली होती! तेच राज आज नव्या गर्तेत सापडले आहेत. राज ठाकरे या करिश्मा असलेल्या नेत्यास अजून पक्षसंघटन जमलेले नाही. पक्ष चालवता आलेला नाही. पार्टीला कार्यक्रम देता आलेला नाही. आता तेच भाजपच्या वळचणीला जाण्याच्या वार्ता आहेत. भाजपला निश्चित विचारसरणी आहे. भाजपचे राष्ट्रीयत्व हिंदुत्वाशी निगडित आहे. गोळवलकर, हेडगेवार यांचे तत्त्वज्ञान हा भाजपचा आत्मा आहे. मनसे प्रबोधनकारांच्या तत्त्वावर उभी आहे. (म्हणजे, राज तरी असे मांडत असतात!) भाजप चातुर्वर्ण्याचे समर्थन करतो, तर मनसे चातुवर्ण्य नाकारते. भाजपला उत्तर भारतीय मतदार प्राणप्रिय आहे, तर मनसे त्यांच्या पूर्ण विरोधात आहे. अशा दोन ध्रुवांवरचे पक्ष एकत्र कसे येऊ शकतात, हे महाराष्ट्र पाहतो आहे. पण राज यांच्यापाशी तसे 'आकडे'ही नाहीत! शिवसेना आज भाजपबरोबर नाही. पण, म्हणून मनसेला सेनेची जागा घेता येईल असे नाही. युतीची गोष्ट निराळी होती. त्या वेळची ती राजकीय अपरिहार्यता होती. आज भाजपला अशा छोट्या घटक पक्षांची गरज नाही. नाहीतर भाजपचे घटक पक्ष असलेल्या रिपाइं, रासप, स्वाभिमानी यांची वाऱ्यावर अशी वरात निघाली नसती. देशात कधी नव्हे ती भाजपविरोधात मोट बांधली जात आहे. ज्याची सुरुवात खरे तर एका अर्थाने राज यांनी केली आहे. देशात मंदीची लाट आहे. तरुण निराश आहेत. एनडीएमधून एकेक पक्ष बाहेर पडतो आहे. भाजपच्या हातून राज्ये निसटत आहेत. अशा काळात राज भाजपच्या वळचणीला जाऊन काय हशील करणार आहेत? पक्ष म्हणून मनसेने सातत्याने भूमिका बदलली आहे. प्रादेशिक पक्षाला निश्चित, पण मर्यादित स्पेस असते. त्यात महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचे अमाप पीक आले आहे. त्यामुळे मनसेला संधी सापडत नाही. त्याचा परिपाक म्हणून राजनी भाजपबरोबर जाणे निश्चित केले असावे. मुळात मनसेचे राजकारण आतबट्ट्याचे राहिले आहे. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते लवकर पांगतात. त्यात राज्यात इतक्यात सत्ताबदल होणे नाही. मग राज भाजपबरोबर जाऊन मिळवणार तरी काय? मनसे, वंचित आघाडी आणि स्वाभिमानी संघटना हे तीन पक्ष मोठ्या कोंडीत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांनी त्यांची कोंडी केेली आहे. त्यामुळे राज यांनी भाजपबरोबर जाण्याची हाराकिरी करण्याची व्यूहरचना केली असावी. पुढचा काळ मोदी, शहा यांच्या ऱ्हासाचा आहे. अशा काळात राज भाजपबरोबर जातील, असे वाटत नाही. तरुणाई ही मनसेची खरी शक्ती आहे. सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये केंद्र सरकारविरुद्ध खदखद आहे. अशा काळात मनसेने भाजपबरोबर जाणे आत्मघात ठरणारे आहे. केवळ 'ईडी'च्या भयातून राज तिकडे जातील असे वाटत नाही. राज यांना आपल्या राजकारणाचे ठोस आशयसूत्र आतातरी ठरवावे लागणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...