आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पोस्टर वॉर सुरु  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री असलेल्या महिला संचालिका छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा आरोप केला होता. या प्रकरणातून अष्टेकर यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी या संचालिकेसह इतर दोघांचा उल्लेख असलेले पोस्टर चित्रपट महामंडळाच्या दारात उभे केले. त्यामध्ये त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी करत चित्रपट महामंडळाचाही निषेध केला. याची माहिती मिळताच महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी हे पोस्टर फाडून टाकले, एवढ्यावरच न थांबता पेट्रोल ओतून ते जाळूनही टाकण्यात आले. या पोस्टरमुळे महामंडळातील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटला आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण? 
चित्रपट महामंडळाच्या अंतर्गत राजकारणातून 30 जुलै 2014 ला अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याचा निकाल अलीकडेच म्हणजे 14 ऑक्टोबरला जाहीर झाला आणि त्यामध्ये अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालाची प्रत  मिळाल्यानंतर अॅड. प्रकाश मोरे आणि अष्टेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली. या घटनेविरोधात छाया सांगावकर, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात 25 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच फौजदारी गुन्हाही नोंद केल्याचे सांगितले. महामंडळाची बदनामी करणा-या या तिघांचेही सभासदत्व रद्द करावे, अशी त्यांनी मागणी केली. हा विषय येथेच थांबला नाही. सोमवारी सकाळी महामंडळाच्या खासबाग येथील कार्यालयाच्या दारातच या घटनेला कारणीभूत असलेल्या सांगावकर, नलवडे आणि पन्हाळकर या तिघांच्याही छायाचित्रासह निषेध करणारा फलक काही चित्रपट व्यावसायिक आणि कामगारांनी लावला. सांगावकर यांना पुन्हा सदस्य करुन घेतल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचाही निषेध असाही उल्लेख त्या फलकावर होता. ही बाब कळल्यानंतर विरोधातील चित्रपट व्यावसायिकांनी सायंकाळी हा फलक काढून पेट्रोल टाकून तिथेच जाळून टाकला. 

बातम्या आणखी आहेत...