आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य समितीच्या तपासणीचा धसका; 450 हंगामी वसतिगृहांची झाडाझडती; एकाच दिवशी तपासणी, सोमवारी येणार अहवाल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांमध्ये बोगसगिरी होऊ नये यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. राज्यस्तरीय पथकाकडून १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची तपासणी होणार आहे. तत्पूर्वीच सीईओ अमोल येडगेंच्या सूचनेवरून शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील सुमारे ४५० हंगामी वसतिगृहांची तालुकास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली. 

 

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांनी स्थलांतर केले आहे. या मजुरांच्या पाल्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यांत हंगामी वसतिगृह सुरू केेले आहेत. मात्र दरवर्षी या वसतिगृहांमध्ये बोगसगिरी होत असल्याच्या तक्रार येतात. त्यामुळे यंदा थेट शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय पथकाकडून जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची तपासणी करण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी हा दौरा होण्याची शक्यता असली तरी सूत्रांच्या माहितीनुसार दौरा पुढे ढकलण्याबाबत हालचाली सुरू आहेत. सीईओ अमोल येडगे यांनी दिलेल्या सूचनेवरून शनिवारी सर्व हंगामी वसतिगृहांची तपासणी केली. सध्या ५७७ वसतिगृहांना मान्यता दिली आहे. त्यापैकी ४५० वसतिगृहांची झाडाझडती घेतली. 

 

यांनी केली तपासणी 
प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी वसतिगृहांची तपासणी केली. मंजुरी, विद्यार्थी संख्या, प्रत्यक्ष हजर विद्यार्थी, जेवणाचा दर्जा, इतर सुविधा यांची तपासणी करण्यात आली. 

 

समितीसाठी रंगीत तयारी 
ही तपासणी म्हणजे राज्य पथकाच्या तपासणीची रंगीत तालीम होती.यामुळे सर्व वसतिगृहचालक सतर्क झाले. रेकॉर्डमधील त्रुटीही समोर आल्याने त्याही राज्य पथक येण्यापूर्वी दुरुस्त होतील. त्यामुळे राज्य पथकांचा दौरा शिक्षण विभागासाठी सुकर होईल.

 

सोमवारी अहवाल 
शनिवारी सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल रविवारी गटशिक्षणाधिकारी तर सोमवारी जिल्हा शिक्षण विभागाकडे येईल. अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. राजेश गायकवाड, शिक्षणाधिकारी 
 

बातम्या आणखी आहेत...