आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे बंडाच्या तयारीत? पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नाही, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला साेडण्याच्या हालचाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ जळगाव : भाजपच्या उमेदवारांची बहुप्रतीक्षित १२५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने यादीची सुरुवात झाली. विद्यमान महिला आमदाराचे तिकीट कापून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काेथरुडमधून (पुणे) उमेदवारी देण्यात आली. पक्षाने १२ आमदारांची तिकिटे कापली असून गणेश नाईक यांचा अपवाद वगळता सर्वच आयात नेत्यांना उमेदवारी दिली. विनाेद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, बाळा भेगडे या मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान नाही. धक्कादायक म्हणजे चार वर्षांपासून पक्षात अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करून त्यांचा मुक्ताईनगर (जि. जळगाव) मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती आहे. पहिल्या यादीत नाव नसल्याने संतापलेल्या खडसे यांनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारणार असल्याचा इशारा दिला.

खडसेंनी शक्तिप्रदर्शन करत एक अपक्ष व एक भाजपतर्फे असे दाेन उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात असूनही मंत्री गिरीश महाजन यांनी त्याकडे पाठ फिरवली. सूत्रांनुसार, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला साेडण्यास भाजप श्रेष्ठींनी संमती दर्शवली. सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांना तेथील उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे खडसे आता बंड करून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

 

'मी काय गुन्हा केलाय, पक्षश्रेष्ठींना याचा जाब विचारणार'
कार्यकर्त्यांशी बाेलताना खडसे म्हणाले, ' गेल्या ४२ वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे संघटन वाढवण्यात मोठे योगदान आहे. आजवर मी अनेकांना तिकिटे वाटली. माझी शिफारस घेत अनेकांनी आमदारकी मिळवली, मात्र आता पहिल्या यादीत माझेच नाव नाही. तिकीट मिळो अथवा न मिळो याची चिंता नाही. पुढच्या यादीत माझे नाव येईलच. मात्र मी काय गुन्हा केला आहे, हे पक्षाला विचारणार आहे. यापूर्वी मंत्रिपद गेले, आता पहिल्या यादीत नाव नाही... काहीही झाले तरी यापुढेही पक्षाचे काम करीतच राहणार. तुम्ही माझ्यासाेबत आहात की नाही?' असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला.

पक्षातच राहणार : विरोधकांनी प्रलोभन देऊनही मी आजवर कधी पक्ष सोडला नाही. आजही पक्ष साेडण्याचा विचार माझ्या मनात नाही, अशी ग्वाही खडसेंनी दिली. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, खडसे बंडखाेरी करून मुक्ताईनगरमधून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

भाजपचे विभागनिहाय उमेदवार
१७ मराठवाडा
३८ विदर्भ
२२ उत्तर महाराष्ट्र
२४ पश्चिम महाराष्ट्र
२४ ठाणे-मुंबई-कोकण

काँग्रेसची ५२ उमेदवारांची दुसरी यादी : मराठवाड्यातील उमेदवार असे : हिंगोली-भाऊराव पाटील, परतूर-सुरेशकुमार जेथलिया, जालना-कैलाश गोरंट्याल, लातूर ग्रामीण- धीरज विलासराव देशमुख, उमरगा-दिलीप भालेराव.

असा ठरला युतीचा फाॅर्म्युला : भाजप १४६ | शिवसेना १२४ | मित्रपक्ष १८
भाजप : २०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. यात २४ जागा वाढवत भाजप १४६ जागांवर लढणार असून १८ जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत.
शिवसेना : विधानसभेच्या १२४ व परिषदेतील भाजप कोट्यातील २ जागा दिल्या जातील. सेनेने २०१४ मध्ये स्वबळावर २८२ जागा लढून ६३ जिंकल्या.

मुख्यमंत्र्यांच्या पीएलाही औशातून तिकीट : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांना औशातून उमेदवारी देण्यात आली. त्यांची लढत काँग्रेसचे आ. बसवराज पाटील यांच्याशी होईल. माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख यांची उमेदवारी कापून तिथे रमेश आडसकर यांना तिकीट दिले आहे.

या आयारामांना तिकीट : राधाकृष्ण विखे- शिर्डी, हर्षवर्धन पाटील-इंदापूर, संदीप नाईक -ऐरोली, बबनराव पाचपुते-श्रीगोंदा, जयकुमार गोरे-माण, वैभव पिचड -अकोले, राणा जगजितसिंह-तुळजापूर, शिवेंद्रराजे-सातारा.