आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीचा राजा, दिवसा डोक्यावर बोजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षातले सहा महिने नाटकासाठी फिरतीवर. फिरतीमुळे पूर्णवेळ नोकरी नाही. निश्चित मानधन नाही. सरकारकडून मिळणारी मदत अत्यल्प, अनियमित. उपजीविकेसाठी प्रसंगी सुतारकाम, गवंडीकाम आणि मोलमजुरी करावी लागणं ही दशावतारा­­त काम करणाऱ्या कलावंतांची शोकांतिका आहे. पण तरीही केवळ या लोकांच्या कलेवरच्या प्रेमामुळेच आज दशावतार जिवंत आहे.

 

‘‘बहुरूपी रूपे नटला नारायणा।
 सोंग संपादून जैसा तैसा।’’

 

बहुरूपी नटलेल्या नारायणाचे संकीर्तन व त्याच्या विविध लीलांची सोंगे संत आणि भगवत भक्तांनी प्रमाण मानली. त्यातूनच दशावतार, लळित, भारूड आदी भक्तिनाट्यांचा उगम झाला. दशावताराची परंपरा कोकणातली. पूर्वरंगात संकासुर, भटजी, सूत्रधार, गणपती, ऋद्धी-सिद्धी अशी या पात्रांचा प्रवेश तर  उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणांमधील आख्यान असं याचं स्वरूप असतं. दशावताराचं आख्यान पौराणिक संगीत नाटकाची आठवण करून देतं. मोठ्या लाकडी अथवा पत्र्याच्या पेटाऱ्यात वेगवेगळे मखोटे घेऊन दशावतारी कलावंत जत्रांच्या म्हणजेच ग्रामोत्सवांच्या मोसमात गावोगाव भटकंती करतात. दशावताराचा उल्लेख दिसतो तो दासबोधात. श्यामजी काळे यांनी इ.स. १७२८ मध्ये कर्नाटकातून दशावतार कोकणात आणला. दशावताराचे वाङ्मयीन उल्लेख दासबोधापासून मिळतात,  समर्थ रामदास म्हणतात, 


खेळता नेटके दशावतारी। तेथे येती सुंदर नारी।
नेत्र मोडिती कळाकुसरी। परी अवघे धटिंगण।।

 

दशावतारातील पूर्वरंगाचा प्रारंभ गणेश स्तवनानं होतो. सूत्रधार गणपतीचे स्तवन सुरू करतो, पडदा बाजूला होताच गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती रंगमंचावर येतात. 


‘नमन गणराया पहिले नमन गणराया
ऐसी गजवदनाची ज्याने भक्ती केली  साची हो
म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो
गणपतीया तुझे नाम स्मरणे हो
हे जिताम ता थैय्या ता’

 

अशा नमनानं पूर्वरंगाला  प्रारंभ होतो. त्याला आडदशावतार म्हणतात. सूत्रधार पायपेटीवर गाऊ लागतो आणि तबल्यावर, पखवाजावर धुमाळी सुरू होते. पूर्वी पूर्वरंग आणि उत्तररंग या भागात दशावतार विभागलेला असे. आता कोकणातील मानाच्या जत्रा जिथे तरंग आणि पालखी असते तेथेच आडदशावतार सादर होतो. अनेक ठिकाणी केवळ गणपतीचे सोंग घेऊन नंतर थेट उत्तररंगात एखादी कथा लावली जाते. कोकणपट्टीत तुळशीच्या लग्नापासून थेट पावसाळा सुरू होईपर्यंत दशावतारी खेळ रंगलेले असतात.


दशावतार कलाप्रकारात स्त्री पात्रांच्या भूमिकाही पुरुष पात्रच साकारत. मात्र, या प्रथेलाही फाटा देत डॉ. तुलसी बेहरे यांनी संपूर्ण स्त्री कलाकारांना सोबत घेऊन दशावताराचे प्रयोग सादर केले. २०१० मध्ये पहिल्या अखिल भारतीय महिला लोेककला संमेलनात डाॅ. तुलसी बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला अकादमीच्या विद्यार्थिनींचा ‘गरूड जन्म’ या कथानकावर महिला दशावतार सादर झाला. डॉ. बेहरे यांनी या लोककलेवर मूलभूत संशोधन केले. त्यांच्या संकल्पना आणि लेखणीतूनच आय. एन. टी तर्फे ‘दशावतारी राजा’ हे नाटक १९८० मध्ये रंगभूमीवर आले. 
बदलत्या कालमानानुसार दशावतारातील पूर्वरंगाला पारंपरिक कलावंतांनी फाटा दिला.  ते आता नाट्यरूपी आख्यानावर भर देताना दिसतात. पूर्वी रामायण, महाभारत आणि पुराणातील आख्याने लावली जायची. अलीकडच्या काळात आधुनिक साईबाबा,गजानन महाराज, स्वामी समर्थ अशा संतांची आख्याने लावली जातात. शिवाय कटाव, दिंडी, साकी इ. गानप्रकाराच्या जोडीनं नाट्यपदांच्या चालीही सादर केल्या जातात.
दशावतारी नाटक हे प्रायोगिक रंगभूमीचं उत्तम उदाहरण आहे. मात्र, पोटाला चिमटा देऊन ही कला जिवंत ठेवणाऱ्या यातल्या कलाकारांच्या व्यथा, रात्रीचा राजा, दिवसा डोक्यावर बोजा अशी झालीय. यातले  बहुतांश कलाकार शेतकरी असतात. मान्सूनचे चार-पाच महिने शेती, उरलेला वेळ नाटक. सहा  महिने नाटकासाठी फिरतीवर असल्यानं त्यांना पूर्णवेळ नोकरीही मिळत नाही. नोव्हेंबर ते मेपर्यंत प्रत्येक कंपनी दीडशेच्या जवळपास प्रयोग करते. मात्र, प्रयोगाच्या मानधनासाठी कंपनी मालकांना सावकारांकडून कर्ज उचलावं लागतं. शिवाय प्रवासाचा, देखभालीचाही खर्च असतोच. त्यामुळे आज बऱ्याच दशावतारी कंपन्या पर्यायानं कलाकारही डबघाईला आले आहेत. कलाकारांना सरकारकडून पुरेशी आणि नियमित मदत नाही. वेळ मिळेल तसं ही मंडळी सुतारकाम, गवंडीकाम करतात किंवा कुठे तरी मोलमजुरीही करतात, परंतु नाटक सोडत नाहीत.


गेल्या काही वर्षांमध्ये दशावतारी कला बऱ्याच स्थित्यंतरांमधून जातेय. पूर्वी या दशावताराचे प्रयोग देवळात व्हायचे. मात्र, पर्यटन विकासाच्या नावाखाली जुनी देवळं पाडून तिथं सिमेंट काँक्रीटची देवळं उभी केली गेली. पण नवीन देवळासोबत दशावतारी नाटकांसाठीचं स्टेज देवळाच्या बाहेर उभं केलं जातं. इथंच प्रेक्षक व नाटकातलं अंतर वाढतं. याचा परिणाम नाटकाच्या अनुभूतीवर होतो. हे दशावतारी कलाकारांनाही जाणवतं. एका नवीन बांधलेल्या देवळात प्रयोग संपल्यावर एक कलाकार मला म्हणाला होता, पूर्वी जुन्या देवळात जी मजा यायची ती आता येत नाही. रंगदेवता आता इथं राहिली नाही. त्या कलाकाराला हे नेमकं का झालं हे सांगता येत नाही, पण त्याला हे जाणवतं मात्र. या परिस्थितीमुळे आज दशावतारात काम करायला तरुण मंडळी तयार नाहीत. त्यामुळे २० ते ३० वयोगटातील कलाकार क्वचितच दिसतात. त्यांना या कलेत भविष्य दिसत नाही. स्वतःचं व कुटुंबाचं पोट भरता येईल इतपत पैसे यात मिळत नाहीत याची जाणीव तरुण मंडळींना आहे. जयवंत दळवींच्या ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये जिवा नावाचं पात्र आहे. गावांत दशावतारी उतरलेत. त्यांना भाजीला काही तरी हवं म्हणून जिवा दुसऱ्याच्या परसातला भोपळा चोरतो. दशावताऱ्यांना नेऊन देतो. दळवींनी हे लिहून पन्नासएक वर्षं झाली असतील. दशावताऱ्यांची परिस्थिती अाजही तशीच आहे. त्यांच्या पानात डाळभात सोडून क्वचित भाजी पडते. जिवासारख्या दशावतारावर प्रेम करणाऱ्या मूठभरांच्या जोरावर दशावतार गावोगावी जिवंत आहे... 

 

डॉ. गणेश चंदनशिवे, इंद्रजीत खांबे 
लेखकाचा संपर्क : ९८२०४५१७१६, ९४२२४३६८०४