आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप उमेदवार राणा पाटील यांना पाडण्याची खासदारांची भाषा निंदनीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना पाडण्याची क्लेशदायक, अशोभनीय भाषा महायुतीचे खासदार ओमराजे यांनी काल केली. ही भूमिका अत्यंत निंदनीय असून यापुढे अशी भाषा केल्यास भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिला. दरम्यान, सेनेसह भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची अनुपस्थिती आणि आता खासदारांच्या वक्तव्यावरून भाजपने घेतलेली भूमिका पाहता येत्या काळात दोन्ही पक्षांमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
उस्मानाबादचे सेनेचे उमेदवार कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार ओमराजे यांनी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यावर भाजपमध्ये खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, सतीश दंडनाईक, नगर पालिकेतील गटनेते युवराज नळे, अॅड.नितीन भोसले उपस्थित होते.
 
कुलकर्णी म्हणाले, खासदार ओमराजे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. त्यांनी मोदीमुळेच निवडून आलो, अशी भावनाही निकालानंतर व्यक्त केली. सकाळ-संध्याकाळ मोदींचे नाव घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता, त्याच मुख्यमंत्र्यांच्या आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालेल्या राणा पाटील यांच्यावर टीका करता, हा युतीचा धर्म नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे. त्यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, क्लेशदायक आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे कालपासून फोन येत आहेत. भाजपला जिल्ह्यातील चारपैकी एकच जागा महायुतीकडून मिळाली. मात्र, चारही जागा कशा निवडून येतील, याचा खासदारांनी विचार करायला हवा. खासदारांच्या या भूमिकेनंतर अन्य मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. त्यांनी आमच्या भावना ऐकण्यासाठी यावे, अशी विनंती केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आम्ही भाजपचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. 
 
खासदारांनी अशा प्रकारची वक्तव्ये थांबवावीत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या स्वाभिनाला धक्का लागत असेल तर मला भूमिका घ्यावीच लागेल. पुढच्या काळात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यांच्या या वक्तव्याबद्दल प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षांना कळवणार आहे, असेही ते म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करताना परस्परांमध्ये समन्वय नसल्याचेही कुलकर्णी यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यामुळे येणाऱ्या काळात सेना-भाजपमध्ये घमासान होण्याची दाट शक्यता आहे.
 

भाजप सोबत नसता तर..
या वेळी नितीन काळे म्हणाले, महायुतीचे खासदार म्हणनू जे निवडून गेले, त्यांचे बोलणे युतीच्या धर्माला चालणारे नाही. भाजपमुळे त्यांना मोठी लीड मिळाली आहे. सोबत भाजप नसता तर काय झाले असते. भाजपच्या ताकदीवर निवडून आलेल्या खासदारांनी द्वेष आपसात मिटवावेत, जाहीरपणे अशी भाषा वापरणे बंद करावे. ज्या ठिकाणी खासदार बोलले त्या उस्मानाबाद मतदारसंघात राणा पाटील उमेदवार नाहीत. त्यामुळे इथे त्यांच्यावर टीका करण्याचा विषयच नव्हता. यापुढे हे सहन केले जाणार नाही.
 

सुरुवात शिवसेनेने केलीय
या वेळी कुलकर्णी म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांनी ज्या पद्धतीने आमच्या उमेदवारावर टीका केली, त्यावरून युतीचा धर्म पाळायचा की नाही सेनेने सांगावे. सुरुवात त्यांनीच केली आहे. आम्ही लोकसभेला जिवाचे रान करून त्यांच्यासाठी मेहनत घेतली. मोदीमुळेच निवडून आलो, अशी जाहीर कबुलीही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती. ज्या पक्षाच्या नेत्यांना मानता त्या पक्षाने दिलेल्या उमेदवारावर टीका कशी सहन केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...