आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातला सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प २ महिन्यांत होणार कार्यान्वित, पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅट वीजनिर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौडगाव एमआयडीसीमध्ये सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे पॅनल बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. - Divya Marathi
कौडगाव एमआयडीसीमध्ये सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे पॅनल बसवण्याची तयारी सुरू झाली आहे.
  • उस्मानाबादच्या कौडगाव एमआयडीसीत ११८ हेक्टरवर प्रकल्प काम
  • महाजनकोमार्फत भेल कंपनीकडून प्रकल्पाची उभारणी, १० वर्षांपर्यंत वीजनिर्मितीसह दुरुस्तीची जबाबदारी भेलकडे

चंद्रसेन देशमुख  

उस्मानाबाद - बहुप्रतीक्षित, मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात आले अाहे. कौडगावच्या (ता. उस्मानाबाद) एमआयडीसीमध्ये अवघ्या दोन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीनंतरचा सर्वात मोठा १०० मेगावॅटचा हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी तथा महाजनकोने या प्रकल्पाचे काम ‘भेल’ कंपनीला दिले आहे. दिवस-रात्र प्रकल्पाचे काम सुरू असून सुमारे ११८ हेक्टरवरील प्रकल्पात ४० स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे.



महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी तथा महाजनकोने सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी शासनाकडून कौडगाव एमआयडीसीमध्ये ११८ हेक्टर जागा घेतली आहे. या जागेत मराठवाड्यातील सर्वाधिक मोठा म्हणजे १०० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकारत आहे. पहिल्या टप्प्यात भेल कंपनीमार्फत ५० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात येत असून, दोन महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऊर्जा निर्मितीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाजनकोकडून ही वीज महावितरणला देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वीज वाहिनी बसवण्यात येत आहे. जिल्ह्यात सौरऊर्जेसाठी वातावरण पोषक असून, ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने मुबलक प्रमाणात सौरऊर्जा तयार होऊ शकते, असा दावा नासा या संस्थेचा आहे. त्यामुळे कौडगावच्या उजाड माळरानावर सौरऊर्जेचा प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले होते. काही परदेशी कंपन्यांनी या जागेची पाहणी करून सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी चाचपणीही केली होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कौडगावच्या पडीक जमिनीवर एमआयडीसी घोषित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मोठ्या क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जावा, यासाठी प्रयत्न झाले. महाजनकोने काढलेल्या निविदेला सरकारच्या धोरणांमुळे विलंब लागत होता. वर्षापूर्वी निविदा उघडल्या गेल्या आणि भेल कंपनीने ऊर्जानिर्मितीचे कंत्राट घेतले. या कंपनीकडून दिवसरात्र युद्धपातळीवर काम सुरू आहे. सौरऊर्जेसाठी लागणारे पॅनल या जागेवर उभारण्यात येत आहेत. तसेच पॅनल मॉड्यूल बसवण्यासाठी खड्डे खोदून खांब उभारण्यात येत आहेत. तयार झालेली वीज घेण्यासाठी महावितरणकडूनही विद्युत वाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे.



लातूरलाही होणार ६० मेगावॅटचा प्रकल्प

महाजनकोच्या माध्यमातून साकारत असलेला धुळे जिल्ह्यातील साक्रीनंतरचा व मराठवाड्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प म्हणून उस्मानाबादच्या सौरऊर्जा प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅट ऊर्जानिर्मिती होत असली तरी दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० मेगावॅट वीजनिर्मिती प्रस्तावित आहे. (सूर्यकिरणांचा प्रभाव वाढल्यास ५० पेक्षा अधिक किंवा प्रभाव कमी झाल्यास ५० पेक्षा कमी मेगावॅट ऊर्जानिर्मिती होते.) महाजनकोने साक्रीमध्ये १२५ मेगावॅट, बारामतीत ५० मेगावॅटचा प्रकल्प यापूर्वी उभारला. यानंतर लातूरमध्ये ६० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.



कमी मनुष्यबळाचा प्रकल्प

उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगारनिर्मितीचे प्रकल्प व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप मोठ्या रोजगार निर्मितीचे प्रकल्प उभारलेले नाहीत. ११८ हेक्टरवर उभारत असलेल्या सौरऊर्जा निर्मितीच्या या प्रकल्पासाठी मनुष्यबळाची गरज लागत नाही. केवळ प्रकल्प उभारणीसाठी कामगारांची गरज असून, त्यानंतर सुरक्षेसाठी ३० ते ४० स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. 



३३० वॅटसाठी एक पॅनल - या प्रकल्पासाठी भेल कंपनीकडून वारी आणि इपोनास कंपनीचे पॅनल बसवण्यात येत आहेत. वारी ही भारतीय तर इपोनास चायना कंपनी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य पुरवठ्यात अडसर येत होता. मात्र, आता साहित्याचा मुबलक साठा उपलब्ध झाल्याने सौरऊर्जेचे पॅनल उभारणीचे काम वेगात सुरू आहे. एका पॅनलवर ३३० वॅट सौरऊर्जा तयार होते. काही प्लेटच्या माध्यमातून एक पॅनल तयार करण्यात येते. २१२ कोटींच्या या प्रकल्पाची कालमर्यादा २५ वर्षांपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...