Editorial / द लास्ट पँथर! (अग्रलेख)

संपादकीय

Jul 17,2019 10:28:00 AM IST

राजा ढाले यांना सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर प्रश्न विचारला होता, ‘तुम्ही कोण ?’ त्यांनी उत्तर दिले होते, ‘बुद्ध-कबीरापासून फुले-आंबेडकरांपर्यंत चालत आलेल्या मानवमुक्तीच्या लढ्यातील एक अत्यंत सामान्य पण सचोटीने आणि अटीतटीने लढणारा मी एक सैनिक आहे.’ ढाले आडनावाचा त्यांना मोठा अभिमान होता. ढाले म्हणजे बिनीचे सैनिक. युद्धाच्या आघाडीवर झेंडा फडकवत ठेवण्याचे काम आपल्या पूर्वजांनी केले आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगत असत. काही माणसं साक्षात इतिहास जगत असतात. ती रहस्यं बनून राहतात. ढाले यांचं जीवन तसं होतं. लिटिल मॅगझिन चळवळ, सत्यकथेची होळी, दलित पँथरची स्थापना, फाटाफूट, मास मूव्हमेंट, भारिप गटाचे नेतृत्व, कित्येक अनियतकालिकांचे संपादन अशी अचाट कामगिरी या माणसाने आपल्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यात करून ठेवली आहे.


मुळात ढाले राजकारणात आलेच अपघाताने. त्यांचा खरा पिंड साहित्यिक आणि चित्रकाराचा होता. त्यामुळे लौकिक अर्थाने ते राजकीय पक्ष, संघटनेच्या नेतृत्वाच्या चौकटीत बसू शकले नाहीत. ते स्पष्टवक्ते होते. त्यांच्याकडून लोक दुखावले जात. कार्यकर्त्यापेक्षा ते पुस्तकात अधिक रमत. त्यांच्या विक्रोळीतल्या घरी भांडी कमी अन पुस्तके अधिक होती. चळवळीला रस्त्यावरच्या लढाईसाठी नेते लागतात तसे वैचारिक व्हॅनगार्ड लागतात. ढाले दुसऱ्या पठडीत बसणारे होते. ते दलित चळवळीचे टीकाकार होते. म्हणून ते चळवळीचे वाभाढे काढू शकत. त्यांची टीका चळवळ योग्य मार्गावर जावी यासाठी होती. आंबेडकरी चळवळीला धम्माचे अधिष्ठान मिळावे, असा त्यांचा हट्टाग्रह होता. तर्कवादात ढाले माहीर होते. वैचारिक वादामध्ये त्यांनी भल्याभल्यांना गार केले. मुंबईची पुस्तकाची दुकाने त्यांना फार प्रिय होती. तशाच चित्रांच्या गॅलऱ्यात ते नेहमी दिसत. दलित चळवळीचं त्यांनीच आंबेडकरी चळवळ असं नामकरण केलं.


जातीय अत्याचाराच्या खटल्यात दलित वकिलांची उणीव असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. मग त्यांनी आंबेडकरी चळवळीतून वकील घडावेत यासाठी काम सुरू केलं. वकिलांचं राज्यव्यापी संघटन बांधण्याचे प्रयत्नही केले. ढाले मनस्वी होते. आवडलं तर आवडलं, नाही तर बोलून मोकळे होत. लेख लिहून द्यायला बराच वेळ घेत. वाटलं तर पूर्ण करत नाही तर मधेच सोडूनही देत. या स्वभावाने मोठी क्षमता असूनही त्यांच्या हातून एकटाकी लिहून झालं नाही. त्यामुळे मराठी साहित्याचं नुकसानच झालं. अलीकडे त्यांनी नागवंशाचा इतिहास लिहायला घेतला होता. तो प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यांचं लेखन कित्येक अनियतकालिकांत विखुरलेलं आहे. हा ठेवा एकत्र आणणं त्यांना वंदना असणार आहे.


ढाले यांनी आयुष्यात अनेक वाद ओढवून घेतले. त्याच्या परिणामांची फिकीर केली नाही. एका पँथरचे मनोगत या कवितेत ते म्हणतात, ‘प्रत्येक अखेरच्या सैनिकानं पहिल्या आघाडीतल्या सैनिकांच्या आवेशात लढाई लढली पाहिजे.’ ढाले संपूर्ण जीवन तसंच जगले. अगदी बिनीच्या सैनिकाप्रमाणे. म्हणून त्यांनी कधी हार मानली नाही. शस्त्र खाली ठेवलं नाही. माफी कधी मागितली नाही. कारण ते ‘ढाले’ हाेते!

X
COMMENT