आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Man Who Knows All \'Right To Information Act\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका प्रकरणात कागदपत्रे जमवताना त्रास झाल्याने मुखपाठ केला माहिती अधिकार कायदा, सात वर्षांमध्ये दिली 156 व्याख्याने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'लालफिती'चा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासन-प्रशासनाच्या कारभारात एखादा दस्तऐवज मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. एका प्रकरणात असाच अनुभव आल्यामुळे जलसंधारण विभागातील अधिकारी जालिंदर तांबे यांनी माहिती अधिकार कायदा मुखपाठ केला. आपल्याला आल्या त्या अडचणी इतरांना येऊ नयेत, यासाठी गत ७ वर्षांत त्यांनी १५६ व्याख्यानेही दिली आहेत. विशेष म्हणजे, आता एखाद्या प्रकरणात अडचणी उद््भवल्याच तर मंत्रालयातूनही त्यांचा सल्ला घेतला जातो. 

 

माहितीचा अधिकार नेमका काय आहे, याची फारशी माहिती अजून अनेकांना नाही. शासकीय कार्यालयातील सुमारे ९० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कायद्याचे बारकावे माहिती नसल्याने गोंधळ उडतो. अशा वेळी सरकारी कर्मचाऱ्यांसह गरज पडेल त्याला तत्काळ मोफत मार्गदर्शन करणारे माहितीच्या कायद्याचे चालते- बोलते विद्यापीठ म्हणजे तांबे. जिल्हा न्यायालयामागे सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या बाजूला मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय आहे. तिथे सहायक प्रादेशिक जलसंधारण अधिकारीपदी तांबे कार्यरत आहेत. १९८३ मध्ये बीई सिव्हिल पूर्ण होताच या विभागात रुजू झालेल्या तांबेंची ३६ वर्षे सेवा झाली आहे.

 

पगार सार्वजनिक, पगारपत्रक वैयक्तिक : 
माहिती अधिकारात वैयक्तिक माहिती द्यावी की नाही, अधिकाऱ्यांचे वेतन वैयक्तिक बाब आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यावर तांबे सांगतात, कोणाचाही पगार ही वैयक्तिक नव्हे सार्वजनिक बाब आहे, परंतु पगारपत्र देय नाही. कारण त्यात वैयक्तिक गुंतवणुकीचा तपशील असू शकतो. कर्जाच्या हप्त्यांची माहिती असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही माहिती वैयक्तिक ठरते. सर्वोच्च न्या सिव्हील अपील नं.२७७३४ / २०१२ (गिरीश रामचंद्र देशपांडे वि.केंद्रीय माहिती आयुक्त) निर्णय दि.३ ऑक्टो.२०१२ यानुसार पगारपत्रक वैयक्तिक आहे. एकूण पगार किती आहे ते सांगता येते, पण पगारपत्रक देणे बंधनकारक नाही. शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने केलेली गुंतवणूक, कर्ज, पाल्यांच्या विवाहात मिळालेल्या भेटी, चल-अचल संपत्ती, आयकर विवरण, सेवापुस्तिका ही माहिती वैयक्तिक स्वरुपाची आहे. माहिती अधिकार कायदा कलम ८ (१) (j) नुसार ही माहिती देणे बंधनकारक नाही. आजारही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे कलम ८(१) (e) नुसार त्याची माहिती देय नाही. पण कुठलाही अधिकारी, पदाधिकारी भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने शिक्षा भोगत असतील व अतीव दक्षता विभागात दाखल असतील तर अशा वेळी आजाराची माहिती देय आहे. 

 

हे आठ अपवाद कायम लक्षात ठेवा.. 
१) जी माहिती दिल्याने देशाची एकात्मता भंग पावेल 
२) जी माहिती न्यायालयाने प्रकाशित करण्यास मनाई केली आहे. 
३)विशेषाधिकाराचा भंग होईल अशी बाब उदा:विधिमंडळ व संसदेचे अधिकार 
४) जी माहिती दिल्यास वैयक्तिक स्पर्धात्मक स्थानी हानी पोहोचेल. 
५) विश्वासाश्रित माहिती,(फक्त डॉक्टरांना सांगतो) 
६) स्रोत ओळखता येईल अशी माहिती (उदा:खून खटल्यातील साक्षीदाराची माहिती) 
७) विदेशी शासनाने विश्वासपूर्वक दिलेली माहिती 
८) अपराध्याचा तपास करणे,त्याला अटक करणे व त्याच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियेला अडथळा निर्माण होईल, अशी माहिती. 
९) जे प्रस्ताव,अंदाजपत्रके, मंत्री परिषद.सचिव अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी जातात त्यावेळी ती माहिती अधिकारात येत नाहीत. मात्र प्रक्रिया पूर्ण होताच ती माहिती अधिकारात येतात. 
१०) वैयक्तिक स्वरूपातील माहिती कलम ८(१) ( j)नुसार माहिती अधिकारात देय नाही. 

 

एका प्रकरणाने बनवले कायदेतज्ञ 

तांबे हे अभियंता असले तरी आपल्याला माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा अभ्यास करावा लागेल, असे त्यांना कधी वाटले नव्हते. जालना जिल्ह्यातील माहिती अधिकाराच्या प्रकरणात खूप त्रास झाला. तेव्हा त्यांनी या कायद्याचा सखोल अभ्यास केला. पुढे हा व्यासंग इतका वाढला की कायदा आणि त्यातील ३१ कलमे मुखपाठ झाली. देशातील विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे केस नंबर तारखेसह सांगतात. 

 

फोनवरून मार्गदर्शन 
तांबे हे फोनवरून मोफत मार्गदर्शन करतात. दिवसभरात त्यांना २५ ते ३० कॉल येतात. या कामासाठी सर्वच कार्यालयांनी प्रशस्तिपत्रे देऊन त्यांचा सत्कार केला आहे. लवकरच मुंबईतील मंत्रालयात त्यांचे सत्र होणार आहे. 

 

अशी आहे उपकलमांची रचना 
माहिती अधिकार कायदा ३१ कलमांचा आहे. यात ८ (१) क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र अशी उपकलमे आहेत. यालाच इंग्रजीत ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे असे वाचले जाते. पण शासकीय अधिकारी मराठी आणि इंग्रजी कलमांत गोंधळतात. तेथेच मोठी पंचाईत होते अन् माहिती मागणारे व देणारे दोघांचा गोंधळ उडतो.