वटपोर्णिमा / पत्नीपीडित पुरुषांचे पुढील जन्मी ही पत्नी नको म्हणून यमराजाला साकडे, पिंपळाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा

पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून सन २०१८ पासून करण्यात येत आहे आंदोलन 

प्रतिनिधी

Jun 16,2019 12:49:00 PM IST


वाळूज - महाराष्ट्रात रविवारी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. मात्र, औद्योगिक परिसरातील पत्नीपीडित पुरुषांकडून मुंजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढच्या जन्मी, गुन्हे दाखल करणारी, छळ करणारी पत्नी नको! असे साकडे पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या पतींकडून थेट यमराजाला घालण्यात आले. माइकच्या माध्यमातून भारूड गात सुरू असणारे अनोखे आंदोलन बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सिडको परिसरात चांगलीच गर्दी केली होती. विशेष म्हणजे या गर्दीत महिलांचासुद्धा सहभाग होता.

वाळूज औद्योगिक परिसरात अनेक वर्षांपासून पुरुषांच्या न्याय हक्कांसाठी विशेषतः महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या कायदेशीर त्रासाबाबत काम करणाऱ्या पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून सन २०१८ पासून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत पुढील जन्मी ही पत्नी नको, असे यमदेवाकडे साकडे घालत अनोखे आंदोलन केले जाते. मागील वर्षीप्रमाणेच यंदासुद्धा शनिवारी सकाळी १० वाजता सिडको येथील पिंपळाच्या वृक्षाभोवती सकाळीच पत्नीपीडित पुरुषांनी गर्दी करत पिपाणीच्या गजरामध्ये झाडाची विधिवत पूजाअर्चा करत भारुडाच्या माध्यमातून आपल्या मनातील शल्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे अनोखे आंदोलन केले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंदोलकांची संख्या दुप्पट दिसली.

यांचा होता समावेश
भरत फुलारे, बापू तरवटे, प्रवीण गाळे, चरणसिंग घुसिंगे, पांडुरंग गांडुळे, जगदीश शिंदे, रमेशचंद्र बापशेट्टी, चंदन भिकन, अॅड. प्रसादकुमार, दिनेश मेहुणकर, नीलेश भाले, संदीप घोळवे, भूषण डोळस, अॅड. डहाळे यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.


.... म्हणून आंदोलनाचा हा मार्ग निवडला
१०० पेक्षा अधिक खोटे गुन्हे एकाच व्यक्तीवर दाखल करणाऱ्या महिलांच्याच बाजूने समाज व त्यासोबत न्यायव्यवस्था व कायदे आहेत. पुरुषांच्या बाजूने कोणीच नाही. माणसांकडून अपेक्षा सोडल्यानंतर किमान देव तरी आमच्या बाजूने उभा राहील, त्याने तरी आमचे म्हणणे ऐकावे, आमच्या पत्नींचे नव्हे, असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी या वेळी दिव्य मराठीकडे व्यक्त केले.

X
COMMENT