आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Martyr's Daughter Has Not Been Admitted To The School For Two Years, Order Of Admission Issued By The Collector

शहिदाच्या मुलीला दोन वर्षांपासून शाळेत प्रवेश नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला प्रवेशाचा आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतल कदम; तेजस्विनी कदम - Divya Marathi
शीतल कदम; तेजस्विनी कदम

नांदेड : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानाबद्दल या देशातील प्रत्येकाच्या मनात आत्मीयता, आपलेपणा आहे. परंतु हाच जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था काय होते याकडे मात्र फार कोणाचे लक्ष जात नाही. जिल्ह्यातील एका शहिदाच्या वीरपत्नीला असाच अनुभव आला. या अनुभवातून उद्विग्न झालेल्या वीरपत्नी शीतल कदमने माझे पती उगीच देशासाठी शहीद झाले, असे हताश उद््गार काढले. ज्ञानमाता शाळेची मुजोरीही या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मुलीला शाळेत प्रवेश देण्याचे आदेश दिले असून मुलीने आता ज्ञानमाता शाळेत न जाता नागार्जुना शाळेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शीतल यांचे पती संभाजी कदम काश्मीरमधील नागरौता इथं २९ नोव्हेंबर २०१६ रोजी शहीद झाले. बेस कॅम्पमध्ये असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण संभाजी कदम यांच्यामुळे वाचले. परंतु संभाजी स्वतः मात्र शहीद झाले. संभाजी यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि आता ६ वर्षांची असलेली तेजस्विनी ही एकुलती एक मुलगी आहे. मुलीला शिकवून मोठे अधिकारी बनवण्याची तिच्या आईची इच्छा आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शीतल कदम गेल्या वर्षी शहरातील ज्ञानमाता इंग्लिश स्कूलमध्ये गेली. पण तिच्या मुलीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा ती या वर्षीही प्रवेशासाठी गेली. तेव्हाही तोच अनुभव आला. अखेर तिने शाळेतील लोकांना आपण वीरपत्नी आहोत. माझ्या मुलीला प्रवेश द्या. जी काही फी असेल ती भरायला तयार आहे, असेही सांगितले. पण तिचे काहीएक न ऐकता परत पाठवण्यात आले. मी देशाचे रक्षण करतो, देश आपल्या परिवाराची काळजी घेईल ही भावना प्रत्येक जवानाच्या मनात असते. परंतु शीतल कदम यांना ज्ञानमाता शाळेत प्रवेश सोडा, सन्मानाची वागणूकही मिळाली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी संभाजी कदमच्या बलिदानाबद्दल खेद व्यक्त केला.

शिक्षण विभागाचा इशारा

ज्ञानमाता विद्याविहार ही खासगी इंग्रजी माध्यमाची विनाअनुदानित शाळा आहे. पण या शाळेला शासनाची मान्यता असल्याने राज्य सरकारचे सर्व नियम या शाळेला पाळणे बंधनकारक आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशात आरक्षण आहे. शाळा हे नियम पळत नसेल तर तिची मान्यता काढण्याबाबत प्रस्ताव पाठवू, असे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.

शाळेची मुजोरी

या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने दोन वेळा शाळेच्या प्राचार्य व उपप्राचार्यांना फोन लावला. प्राचार्य फादर सिजुमोन यांनी फोन उचलला नाही. उपप्राचार्य अरुण यांनी फोन उचलला, पण उत्तर दिले नाही.

ज्ञानमाता शाळेविरोधात गुन्हे दाखल करा, मान्यता रद्द करा

संभाजी कदम यांच्या मुलीला ज्ञानमाता हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने प्रवेश नाकारून शाळेत प्रवेश देण्यास मनाई केली. शाळेच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा शाळेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला.

शहिदाची मुलगी ज्ञानमाता ऐवजी नागार्जुनाच्या वाटेवर

शहीद संभाजी कदम यांची मुलगी तेजस्विनी हिच्या शाळा प्रवेशावरून बुधवारी दिवसभर चांगलेच वादंग माजले. सायंकाळी या संदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना एक बैठक घ्यावी लागली. बैठकीत ज्ञानमाता शाळेत मुलीला प्रवेश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला आदेश दिले. परंतु, आता शहिदाच्या मुलीनेच ज्ञानमाता शाळेत न जाता नागार्जुना शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

शाळेत प्रवेश देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शहीद कदम यांच्या मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत शाळेचे मुख्याध्यापक फादर शिजमून, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची बैठक घेतली. समन्वयाच्या अभावातून हा प्रश्न निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. मुलीला शाळेत प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले. उद्या मुलीला शाळेत प्रवेश मिळेल, असे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...