आयपीएल : पांड्या बंधूची कमाल कामगिरी; मुंबई इंडियन्सची दिल्लीवर मात

वृत्तसंस्था

Apr 19,2019 09:01:00 AM IST

नवी दिल्ली - पांड्या बंधू कृणाल व हार्दिकने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर आयपीएलच्या १२ व्या सत्रात गुरुवारी ४० धावांनी विजय मिळवला. अष्टपैलूू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या सामनावीर ठरला. मुंबईने २० षटकांत ५ बाद १६८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १२८ धावा करू शकला.


मुंबईच्या १६ षटकांत एकवेळ ११० धावा होत्या. कृणाल व हार्दिकने अखेरच्या ४ षटकांत ५८ धावा ठोकल्या. हार्दिकने १५ चेंडूत २ चौकार व ३ षटकार खेचत ३२ धावा केल्या. कृणालने २५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा ठाेकल्या. कर्णधार रोहित शर्मा व डी कॉकने ५० धावांची भागीदारी केली. रोहितने आपल्या १२ धावा करताच टी-२० मध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह ३० अाणि डी कॉकने २७ चेंडूत २ चौकार व २ षटकार खेचत ३५ धावा केल्या. रबाडाने ३८ धावांत २ व अमित मिश्रा व अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

X
COMMENT