आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच म्हणून मागितली चक्क बिअर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लाच म्हणून केवळ पैसेच नव्हे, तर सोन्या-चांदीचे दागिने, जमीन-जुमला एवढेच नव्हे, तर एखाद्या स्त्रीकडे शरीरसुखही मागण्यापर्यंत सरकारी अधिकाऱ्यांची पातळी गेली आहे. मात्र, लातूरमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्याचेच काम करून देण्यासाठी त्याच्याकडे चक्क व्हिस्की व बिअरची मागणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणी ‘अ’ वर्ग २ च्या पदावर   भालचंद्र हरिहर चाकूरकर (४३) हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्याकडील एका कर्मचाऱ्यास  २०१८-१९ या कालावधीतील अहवालावरील  ‘बी प्लस’ असा शेरा मिळाला होता. मात्र,  नोकरीत पुढे फायदा व्हावा यासाठी त्यांना “ए प्लस’ असा शेरा हवा होता. त्या कर्मचाऱ्याने याबाबत चाकूरकर यांच्याकडे फाइल पाठवून ए प्लस शेरा मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, हे काम करून देण्यासाठी तीन बिअर आणि व्हिस्की पाजण्याची मागणी भालचंद्र चाकूरकर या वैद्यकीय अधिकाऱ्याने केली. मधल्या काळात संबंधित अर्जदार कर्मचाऱ्याने पुराव्यानिशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी ती पडताळून शुक्रवारी रात्री लातूर-औसा रोडवरील एका हॉटेलात सापळा रचला. 


पार्टीसाठी मागणी केल्याप्रमाणे एक व्हिस्कीची बाटली  आणि ३ बिअरच्या बाटल्याही मागवण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी चाकूरकर याने दारूचा पेग तोंडाला लावताच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक वर्षा दंडिमे, कुमार दराडे या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी करत असून लाचेच्या साहित्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. बाजारात ९८० रुपये किंमत असलेल्या दारूने वैद्यकीय अधिकाऱ्याला या कारवाईला सामोरे जावे लागले असून शुक्रवारी रात्री त्याच्यावर  विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली.