आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारगाणी बनवणाऱ्या कलाकारांचा मंदीने हरवला आर्थिक सूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : प्रसिद्ध गाण्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत संदेश पाेहोचवणे, हे आपल्याकडील निवडणुकांचे वैशिष्ट्य आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची ऑडिओ, व्हिडिओ गाणी बनवणाऱ्या कलाकारांना आर्थिक मंदीचा माेठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा केवळ ३० ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याची माहिती कलाकारांनी दिली.

यंदा सर्वच राजकीय पक्षांच्या युती, आघाडी हाेण्यात बराच कालावधी गेला आणि उशिराने त्याच्या घाेषणा झाल्या. त्यामुळे उमेदवारांची नावे ठरण्यात माेठा कालावधी गेल्याने प्रत्यक्षात उमेदवारांना मतदारसंघात प्रचार करण्याकरिता कमी वेळ मिळालेला आहे. झिंगाट...शांताबाई..हलगी बजाव...आवाज नकाे डीजे..अशा उडत्या चालीच्या गाण्यांना उमेदवारांची सर्वाधिक पसंती असून या गाण्यांच्या चालीवरून गाणी तयार करून विकासकामे आणि आश्वासने लाेकांपर्यंत प्रभावीपणे पाेहोचवली जातात. काही ठिकाणी पारंपरिक लाेकगीते, गाणी, भारुडे यांच्या चालीवरही प्रचारगीते तयार केली जातात. गाण्यांचे माध्यमातून लाेकांना आकर्षित करण्यासाठी सर्व उमेदवारांची दरवेळी लगबग सुरू असते मात्र, यंदाच्या निवडणुकीत ती मंदावलेली दिसून येत आहे. 
उमेदवारांची नेमकी गरज कशा प्रकारे आहे ती ओळखून त्यानुसार गाण्यांची रचना केली जाते. वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात पक्ष आणि उमेदवाराबाबतची माहिती मिमिक्रीद्वारे गाण्यांच्या स्वरूपात रचली जाते. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, साेलापूर, नागपूर अशा शहरांमध्ये प्रामुख्याने ऑडिओ आणि व्हिडिओ प्रचारगीते तयार करण्याचे काम स्टुडिओत सुरू आहे. पुण्यात ४० ते ५० गाणी रेकाॅर्डिंग करणारे स्टुडिओ असून प्रचारगीतांची गाणे रेकाॅर्ड करण्याकरिता यंदाच्या निवडणुकीत त्यांना अत्यल्प प्रतिसाद उमेदवारांकडून मिळालेला आहे. पूर्वी निवडणुकीच्या प्रचारकामात नाटक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना एक महिन्यापर्यंत पथनाट्याची कामे मिळत. परंतु फेसबुक, व्हाॅट्सअॅप अशा साेशल मीडियाच्या माध्यमातून कमी खर्चात प्रचार हाेऊ लागल्याने पथनाट्यांची संख्या राेडावली आहे. पथनाट्यांच्या जागी ठिकठिकाणी एलइडी स्क्रीन लावून प्रचार केला जात आहे.

प्रचारगाण्यांच्या संख्येत दरवेळच्या तुलनेत घट
प्रचारगीतांचे लिखाण, गायन आणि निवेदन करणारे कलाकार संताेष चाेरडिया म्हणाले, निवडणूक काळात उमेदवारांचा अजेंडा चांगल्या प्रकारे जनतेसमाेर मांडण्यासाठी प्रचारगाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्या दृष्टीने मनाेरंजनाच्या माध्यमातून प्रचारगीतांद्वारे लाेकजागृती केली जाते. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा कलाकारांना मंदीचा फटका बसल्याचे जाणवत आहे. ऑडिओ गाण्यासाठी २० ते २५ हजार आणि व्हिडिओ गाणी करण्यासाठी ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत खर्च येताे. परंतु उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत प्रचारास कमी कालावधी मिळाल्याने त्याचा परिणाम प्रचारगाण्यांची संख्या दरवेळच्या तुलनेत घटल्याचे जाणवत आहे.

बातम्या आणखी आहेत...