आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Most Spectacular Closure Of The Decade In The Northeast; Writers, Artists, Students, Traders Are Also On The Streets In Assam Against Citizenship Bill

ईशान्येत दशकातील सर्वात उत्स्फूर्त बंद; आसामात लेखक, कलाकार, विद्यार्थी, व्यापारीही रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसाममध्ये जनतेने केला तीव्र बंद, लोक उत्स्फूर्त घरातून बाहेर, ३० संघटनांचा पाठिंबा

नॅशनल डेस्क- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर केंद्र सरकारच्या सर्व आश्वासनांनंतरही ईशान्येत सलग दुसऱ्या दिवशी लोकांनी तीव्र निदर्शने, आंदोलने सुरूच ठेवली होती. मंगळवारी आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल, मेघालयात निदर्शने झाली. आसाममध्ये ३० पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या संघटनांशी संबंधित लोक रस्त्यावर उतरले होते. त्यात साहित्यिक, कलाकार, समाजसेवक, व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाचा समावेश आहे. हा बंद ईशान्येतील दहा वर्षांतील सर्वात प्रभावी बंद असल्याचे म्हटले जाते. पहिल्यांदाच सरकारच्या विरोधात एवढ्या मोठ्या संख्येने लोक उतरले होते. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. लोक नागरिकत्व दुुरुस्ती विधेयक मागे घेणे, संघ-भाजप गो-बॅक अशी घोषणाबाजी करत होते. नागालँडमधील लोक त्यात सहभागी झाले नव्हते. हॉर्नबिल उत्सव हे त्यामागील कारण सांगितले जाते. आंदोलनाचा मोठा प्रभाव संपूर्ण ईशान्य राज्यांत दिसला. परंतु त्यातही व्यापक परिणाम मात्र आसाम, त्रिपुरा, मेघालयात होता. आसाममध्ये मंगळवारी ११ तासांच्या बंदची हाक देण्यात आली होती. राज्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. दिब्रुगड व जोरहाटमध्ये निदर्शने सुरू असताना जाळपोळ झाली. अनेक दशकांनंतर आसामच्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसला. हा बंद पाहून लोकांना ७०-८० च्या दशकातील आसाम आंदोलनाची आठवण झाली. बंदचे आवाहन भलेही उत्तर पूर्व विद्यार्थी संंघाने (नेसो) केले असले तरी त्यास ईशान्येतील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. दुपारपर्यंत हे सर्वसामान्यांचे आंदोलन झाले होते. दिवसभर सुरक्षा दल व बंद समर्थक यांच्यात तणाव दिसला. लोकांनी अनेक शहरांत टायर जाळले. पोलिसांनी कडक कारवाई करताना अनेक ठिकाणी समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बळाचा सौम्य वापर करून आंदोलकांना पळवून लावण्यात आले. अनेक ठिकाणांवर निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प केली. काही रेल्वेंना रोखण्यात आले. आसाममध्ये सामान्य नागरिकांनी बंद प्रभावी बनवला. लोक स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडताना दिसले. त्यामुळेच प्रमुख मार्गांसह छोट्या मार्गांवर शुकशुकाट होता. ११ तासांच्या बंदमध्ये चहापानाच्या टपऱ्याही बंद राहिल्या. पूर्वी बंदचा परिणाम अर्धा दिवस राहायचा. परंतु, दशकांनंतर बंदचा कालावधी संपल्यानंतरही रस्ते सुनसान दिसून आले होते. या वेळी बसही रस्त्यावर दिसून आली नव्हती. सामान्यपणे बंददरम्यान सरकारी वाहने थांबत नसत. या वेळी छोट्या-मोठ्या दुकानदारांनीही बंदला पाठिंबा िदला. गुवाहाटीमध्ये एक हिंदी भाषिक दुकानदारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा चांगल्या कामासाठीचा बंद आहे. त्यामुळे आज दुकान उघडले नाही. बंद समर्थकांनी भाजपचे खासदार व आमदारांच्या घरासमोर निदर्शने केली. काही लोकांनी गुवाहाटीमध्ये खासदार कुइन आेझा यांच्या घरात घुसून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. 

आसामी चित्रपट कलाकार ढोल-नगाऱ्यासह रस्त्यावर उतरले


गुवाहाटीत आसामचे कलाकार ढोल-नगारे घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यात लोकप्रिय गायक, आसामी सिनेमातील कलावंत इतर कलाकार मंडळीही सहभागी झाली होती. लोकप्रिय गायक जुबिन गर्ग, अभिनेत्री वर्षाराणी विषया यांनी विरोधाचे आवाहन केले. रवी शर्मा यांनी भाजपचा राजीनामा देत नागरिकत्व विधेयकाच्या विरोधातील आंदोलनात उडी घेतली. विधेयक मागे घेण्यात आले नाही, तर जपानच्या पंतप्रधानांच्या गुवाहाटी दौऱ्यात कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला जाणार नाही, असा इशाराही कलाकारांनी दिला आहे. दिग्दर्शक जान्हू बरुवा यांनी गुवाहाटीमध्ये होऊ घातलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातून आपला चित्रपट ‘खुली खिडकी’ मागे घेतला. साहित्यिक, चित्रकारांनीही विरोध केला. आसूचे सल्लागार डॉ. समुज्ज्वल भट्टाचार्य म्हणाले, विधेयकाच्या विरोधात संपूर्ण ईशान्येतील लोकांची एकजूट आहे.

भीती : एनआरसीत वगळलेले १२ लाख हिंदू बंगाली नागरिक होतील


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने शरणार्थींना नागरिकत्व मिळेल, अशी भीती उत्तर-पूर्वेतील मोठ्या वर्गाला वाटते. यामुळे त्यांची ओळख, भाषा आणि संस्कृती धोक्यात येईल. विशेषत: आसामच्या लोकांचे म्हणणे आहे की, जर विधेयक लागू झाले तर आपल्याच राज्यात आसामी भाषिक अल्पसंख्याक होतील. आसाममध्ये एनआरसीच्या अंतिम यादीतून ज्या १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे, त्यात सुमारे १२ लाख हिंदू बंगाली असल्याचे सांगितले जात आहे.

विश्वास : सरकार आसामींचे कधीच नुकसान करणार नाही


आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सुरक्षेची हमी देताना सांगितले की, आमच्या सरकारने कधीच आसामी लोकांचे नुकसान केले नाही व करणारही नाही. आसामी भाषी लोकांच्या सुरक्षेसाठी आधीपासून काम करत आहोत. तुम्ही आंदोलनाने आसामचे भविष्य बदलू शकत नाही. त्यांनी सांगितले की, काही  लोक अफवा पसरवून राज्यात अराजकता निर्माण करत आहेत. विधेयकामुळे लोकांना अडचणी येणार नाहीत. त्यांच्या सुरक्षेसाठी अासाम करारातील कलम ६ प्रभावी करत आहोत.

वस्तुस्थिती : केवळ आसामी भाषी बहुसंख्याक, १२% कमी होतील


आसाममध्ये बांगलादेशातून येऊन वास्तव्य करणारे बंगाली हिंदू- मुसलमान आधी बंगालीच लिहायचे. मात्र, नंतर त्यांनी अासामी आपली भाषा म्हणून स्वीकारली. हळूहळू लिहायला आणि वाचायलाही लागले. बंगाली भाषा बोलणाऱ्यांनी जर आसामी भाषा सोडली तर आसामी भाषिक ३६% च राहतील. तर आसाममध्ये बंगाली भाषिक २८% आहेत. नागरिकत्व विधेयक लागू झाल्याने बंगालि भाषिक ४०% पर्यंत जातील. सध्या येथे केवळ आसामी बहुसंख्याक भाषा आहे.

राजकारण : हिंदू मतांचे २०२१ च्या निवडणुकीआधी ध्रुवीकरणावर लक्ष


जाणकारांचे मत आहे की, नागरिकत्व विधेयक लागू झाल्याने आसाममध्ये धर्माच्या आधारे राजकीय ध्रुवीकरण होईल. स्थानिक मुद्यांचे महत्त्व कमी होईल. भाजप व संघ हिंदू राजकारणाला पुढे आणत आहेत. याच अजंेड्याने २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात पहिल्यांदाच सरकार बनवले. १२६ पैकी ६० जागा जिंकल्या. सहकारी आसाम गण परिषदेने १४ जागा जिंकल्या. आधीच्या निवडणुकीत भाजपच्या केवळ ५ जागा होत्या. पुढची निवडणूक २०२१ मध्ये होईल.

विधेयकावर प्रतिक्रिया

देशातील १ लाख श्रीलंकन तामिळींनाही नागरिकत्व मिळावे : रविशंकर

अाध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर यांनी देशातील तामिळींचे समर्थन केले. देशात ३५ वर्षांपासून राहणाऱ्या श्रीलंकन तामिळींना नागरिकत्व देण्याबाबत विचार करायला हवा, अशी  भारत सरकारला विनंती आहे. त्यावर जरूर विचार व्हावा, असे ट्विट रविशंकर यांनी केले .
समर्थन करणारा कोणीही असो, तो देशाच्या मूलतत्त्वावर हल्ला करतोय : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हणाले- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आडून हा संविधानावर हल्ला आहे. समर्थन करणारा देशाच्या मूलतत्त्वावर हल्ला करत आहे. त्याला नष्ट करू पाहतोय. त्यांच्या वक्तव्याला शिवसेनेशी जोडून पाहिले जात आहे.