आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट नव्या वळणावर (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट हे 'स्टेटमेंट' असते. जागतिकीकरणानंतर माध्यमांचा कोलाहल वाढलेला असताना तर सिनेमाची परिभाषा बदलणे अगदी स्वाभाविक आहे. गुरुवारी 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' व 'ठाकरे' या चित्रपटांचे ट्रेलर पाहून राजकीय वातावरण तापवले जात आहे. त्याला आगामी लोकसभा निवडणुकांचे संदर्भ आहेत. 'द अॅक्सिडेंटल..'चे प्रोमो पाहिल्यास त्यात माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व सध्याचे काँग्रेस अध्यक्ष हे पडद्याआडून डॉ. मनमोहन सिंग सरकारची सूत्रे हलवत होते, असे दर्शवण्यात आले आहे. तर,'ठाकरे'च्या प्रोमोमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या तोंडून दाक्षिणात्यांवरचे हल्ले, मुंबई दंगलीचे समर्थन दिसून येते. एकाची प्रतिमा उदात्त दाखवत दुसऱ्याची प्रतिमा खाली खेचणे एवढाच चित्रपटाचा हेतू असेल तर ती कलाकृती सकस ठरत नाही. मात्र, कोणती कलाकृती सकस आणि कोणती कमी दर्जाची, हे पुन्हा सापेक्ष आहे. असे चित्रपट प्रेक्षक किती गंभीरतेने घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गमतीचा भाग असा की 'द अॅक्सिडेंटल..'चा ट्रेलर भाजपच्या आयटी सेलने ट्विटरवरून प्रमोट केला, तर शिवसेना 'ठाकरे' प्रदर्शित करण्यासाठी आपली सर्व राजकीय शक्ती पणाला लावण्यास सज्ज झाली आहे. अशा राजकीय कुरघोडींमुळे कलेच्या आशयालाच बाधा पोहोचते. दुसरी गोष्ट म्हणजे, या वर्षात 'सुई धागा', 'परमाणू', 'पॅडमॅन', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' यांसारखे तद्दन प्रचारकी, वृथा राष्ट्रीय अभिमान व्यक्त करणारे चित्रपट आले. त्यांनी बॉलीवूडची उंची वाढली नाही.

 

भारतीय राष्ट्रवादाला ज्या घटकांनी आकार दिला, त्यामध्ये हिंदी सिनेमांची भूमिका फार मोठी आहे. स्वातंत्र्य चळवळीशी तुलना करावी, एवढे योगदान बॉलिवूडचे आहे. बॉलीवूडची मुळे बहुसांस्कृतिक, बहुआयामी, सेक्युलरिझमची आहेत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. या वर्षांतील हिंदी चित्रपटांवर नजर टाकल्यास बहुतेक चित्रपट नव्या विषयांचे, नवी मांडणी घेऊन आले होते, काही सध्याच्या राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे होते तर काही थेट प्रचारकी स्वरूपाचे होते. चित्रपटांवर आसपासच्या राजकीय-सामाजिक-धार्मिक घडामोडींचा परिणाम दिसून येणे अपरिहार्य आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यानंतर संपूर्ण कलाविश्व ढवळून निघाले. अभिव्यक्तीची गळचेपी सुरू होते, तेव्हा कलामाध्यमे अधिक रसरशीत होतात. कलेचे नाते अवघ्या मानवी मूल्यांशी असते. त्यामुळे हे जग सुंदर करण्याचा प्रयत्न कला करत असतेच. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कलामाध्यमे थेटपणे भूमिका घेताना दिसत आहेत. चित्रपट, नाटक, साहित्य, शॉर्टफिल्म्स अशा अनेक माध्यमांतून ते ठळकपणे जाणवत आहे. कालपर्यंत ज्यांना आवाजच नव्हता, असे अनेकजण आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत. मराठीमध्ये जी नावे अलिकडे दिसू लागली आहेत, ती पाहिली तरी त्याची साक्ष पटते. वेगळा विचार मांडला म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांचे खून झालेले असतानाच, वेगळा विचार मांडू पाहणारे अनेक कलावंतही दिसत आहेत. त्यामुळेच सिनेमाचा बदलणारा पट या वर्षाने अधोरेखित केला. अभिव्यक्तीची घुसमट होते तेव्हा ती विद्रोहाचे, बंडखोरीचे रूप घेते. 'एफटीआयआय'सारखी अनेक उदाहरणे सांगता येतील, जिथे कलावंतांनी रस्त्यावर उतरून भूमिका मांडली. असाच बदल चित्रपटांनीही अनुभवला. या वर्षात 'मुक्काबाज', 'मुल्क', 'काला', 'मंटो', 'राझी', 'भावेश जोशी' हे चित्रपट या उत्कृष्ट कलाकृती ठरल्या. राजकीय, सामाजिक पातळीवर मूलगामी भाष्य करणाऱ्या अशा या कलाकृती होत्या. भारतीय समाजात मुरलेल्या वर्गीय, जातीय संघर्षांना प्रश्न विचारणाऱ्या होत्या. थिएटरमधून बाहेर पडणारा प्रेक्षकही अस्वस्थ दिसत होता. महत्त्वाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर या चित्रपटांनी प्रचारकी चित्रपटांना सहज मागे टाकले. 'आर्ट फिल्म्स' पाहणारा प्रेक्षक एलिट वर्गातलाच असतो, असा जो काही समज झाला आहे तो या चित्रपटांनी खोडून काढला. या चित्रपटांच्या यशाने नव्या विषयांना प्रेक्षक स्वीकारत असल्याचे दिसून आले. बॉलीवूडमधील प्रॉडक्शन हाऊस अशा गंभीर चित्रपटांसाठी पैसा खर्च करण्याची तयारी दाखवू लागले, हेही उल्लेखनीय असे आहे. प्रेम, पंजाबी थाटाची लग्ने, एनआरआयचे देशप्रेम अशा एकसुरी विषयांना बॉलीवूड हळूहळू सोडचिठ्ठी देत असल्याचे दिसून आले. या सगळ्या धबडग्यात मराठी चित्रपटसृष्टी आसपासच्या संवेदना किती टिपते, हा संशोधनाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय, हिंदी व अन्य प्रादेशिक चित्रपटांच्या सोबत मराठी चित्रपटाने प्रवास करण्याचे नेहमीच टाळले. त्यामुळे मराठी चित्रपट हे विद्रोही, बंडखोर अथवा जीवनभाष्य करणारे नाहीत, तसेच ते प्रचारकी नाहीत. त्यामुळे या वर्षांत उत्तम म्हणावेत असे मराठी चित्रपट आले नाहीत. मात्र, ठिकठिकाणी झालेल्या लघुपट महोत्सवांतून काही आश्वासक दिग्दर्शक दिसले. आगामी वर्षात मराठी चित्रपट बदलू शकतो, अशी ग्वाही त्यांच्यामुळे मिळाली!

 

बातम्या आणखी आहेत...