आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - घरासमोरील महिलेसोबत असलेल्या वडिलांच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या ३० वर्षीय राहुल अशोक जाधव (३०, रा. रेणुकानगर, गारखेडा) याची आत्महत्या नसून वडिलांनीच त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार दीड वर्षानंतर उघडकीस आला. प्रलंबित गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षकांनी जुनी फाइल उघडली. ती बारकाईने बघितल्यावर त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि ही भयंकर घटना समोर आली.
बीए उत्तीर्ण राहुल महापालिकेत कंत्राटी स्टोअर कीपर म्हणून कामाला होता, तर अशोक जाधव (५७) महापालिकेतच वरिष्ठ लिपिक आहेत. २५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७ वाजता रेणुकानगर, गारखेडा येथील घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहुल मृतावस्थेत आढळून आला होता. त्याने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून फाइल तशीच ठेवून दिली.
मृतदेह छताच्या हुकाला बेडशीट लावून अडकवला, संशय नको म्हणून हूक वाकवले : २४ एप्रिल २०१८ रोजी अशोकने त्या महिलेच्या मुलाचा वाढदिवस स्वत:च्या पैशाने खर्च करत साजरा केला. ते पाहून राहुलने तिच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. यामुळे पुन्हा भांडणे झाली आणि रात्री दीडच्या सुमारास वरच्या मजल्यावर एकट्याच झोपलेल्या राहुलचा अशोकने गळा दाबून खून केला. मग बेडशीट त्याच्या गळ्याभोवती आवळले. त्याला छताच्या हुकाला अडकवले. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून हूकही वाकवले होते. सकाळी त्यानेच राहुलने आत्महत्या केले, अशी आरडाओरड केली.
त्याने विरोध सुरू केला :
अशोकचे घरासमोरील ४० वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबंध होते. राहुलसह त्याचे दोन भाऊ, बहीण व आईलाही याची माहिती होती. अशोक पत्नीशी २० वर्षांपासून बोलत नव्हता. २०१७ मध्ये राहुलचे लग्न झाले. त्यानंतर त्याने वडिलांच्या अनैतिक संबंधाला टोकाचा विरोध केला.
मृत्यूनंतर गोंडस मुलीचा जन्म :
खून होण्यापूर्वी दीड वर्ष आधी राहुलचे लग्न झाले होते. आठ महिन्यांची गर्भवती पत्नीला माहेरी सोडून तो २२ एप्रिल २०१८ रोजी घरी आला होता. राहुलच्या मृत्यूनंतर दीड महिन्याने त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याची पत्नी कायम राहुलच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करत होती. अशोक तिला दमदाटी करत असल्याने तिने काही महिन्यांपूर्वीच सासर सोडले होते.
दुसरे प्रकरण उघडकीस :
घाटीत शवविच्छेदन अहवालासाठी व्हिसेरा राखून ठेवला होता. सोनवणे यांनी तो दीड वर्षानंतर मिळवला. यापूर्वी एका संशयित मृत्यूचे प्रकरण सोनवणेंनी उघडकीस आणले होते. त्यात डॉ. राणा याला अवैध गर्भपात केल्याबद्दल अटक झाली.
एक प्रश्न पडला...अन्् सुगावा लागला
आठ दिवसांपूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक घनश्याम सोनवणे प्रलंबित प्रकरणांच्या फायली चाळत होते. त्यांच्यासमोर राहुलच्या प्रकरणाची फाइल आली तेव्हा त्यात शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आलेला नाही, असे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा हा अहवाल का आला नाही, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तातडीने घाटीच्या डॉक्टरांशी संपर्क साधत अहवाल मागवला. त्यात राहुलचा मृत्यू गळा दाबल्याने (लिगेचर स्ट्रँग्युलेशन) झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी नोंदवल्याचे समोर आले. मग सोनवणेंनी उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्यासोबत चर्चा करून उपनिरीक्षक विकास खटकेंना सोबत घेत खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा वडिलांनीच मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचे उघड झाले. अशोक जाधवला महापालिकेतून अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक विनायक कापसे करत आहेत.
पोलिस घरात शिरताच तिने कॉल करून सांगितले...
बुधवारी पोलिस पथक जाधवच्या घरात शिरताना पाहून ‘त्या’ महिलेने त्याला कॉल करून याची माहिती दिली. तेव्हा तो तिला म्हणाला की, काही काळजी करू नकोस. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, अशोक जेव्हा मुलाला मारून टाकण्याची भाषा करायचा तेव्हा मी त्याला विरोध करत होते. खून केल्यानंतर तो माझ्याकडे आला होता. त्याने दारू प्राशन केली आणि मी त्याला मारले, असे सांगितल्याची माहितीही त्या महिलेने पोलिसांना दिली.
आई म्हणाली, उशिरा का होईना देवाने तुम्हाला पाठवले...
अशोकची कुटुंबावर दहशत होती. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुमच्या आईचा खून करेल, अशी धमकी तो देत होता. त्यामुळे मुले, मुलगी, पत्नीने मौन बाळगले. परंतु त्यांच्या मनात खदखद होती. बुधवारी सोनवणे त्यांच्या घरी गेले तेव्हा गर्भवती असल्याने माहेरी आलेली राहुलची बहीण, आई घरातच होती. त्या पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या की, देवाने तुम्हाला उशिरा का होईना पाठवले. आता माझ्या मुलाला, भावाला न्याय मिळेल. पतीनेच मुलाला मारले, असे अशोकच्या पत्नीने सांगितले. पोलिसांनी ८ तास अशोकवर प्रश्नांच्या फैरी झाडल्यावर सत्य बाहेर आले .
फुटलेला चष्मा ठरला महत्त्वाचा पुरावा :
ज्या खोलीत अशोकने राहुलचा खून केला तेथे त्या दोघांत काही वेळ झटापटही झाली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या पंचनाम्यात खोलीत एक फुटलेला चष्मा आढळला होता. तो अशोकचा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. घटना घडली तेव्हा घराचा मुख्य दरवाजाही बंद होता. त्यामुळे अशोकनेच हा प्रकार केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.