आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुफान दगडफेक सुरू असताना रेल्वे प्रवाशांना चिमुकल्यांनी पुरवले जेवण; अद्रिका, कार्तिकला 24 जानेवारीला देणार नॅशनल चिल्ड्रन अवॉर्ड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरैना- १० वर्षांची चिमुकली अद्रिका आणि तिचा १४ वर्षीय भाऊ कार्तिक यांची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

 

गेल्या २ एप्रिल रोजी भारत बंददरम्यान मध्य प्रदेशातील मुरैना येथे जोरदार दगडफेक सुरू होती. दुसरीकडे पोलिसांनी गोळीबार सुरू केला होता. अशा स्थितीत रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना जेवण पुरवून अद्रिका आणि कार्तिक यांनी जे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दोघे घराबाहेर पडले तेव्हा पोलिसांनी अडवले आणि घरी परत जाण्यास सांगितले. तरी दोघे लपत-छपत रेल्वेपर्यंत पोहोचले. घडेल तेवढ्या प्रवाशांना जेवण आणि पाणी देऊनच परतले. अद्रिका आणि कार्तिक या धाडसी भावंडांनी सांगितलेली कहाणी त्यांच्याच शब्दांत... 

 

'गेल्या २ एप्रिल रोजी भारत बंद आंदोलन सुरू होते. शाळेला सुटी होती. आम्ही दोघे टीव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात आंदोलन तीव्र झाल्याची बातमी आली. शहरात दगडफेक आणि गोळीबार सुरू झाला होता. आंदोलकांनी रेल्वे रोखून धरली होती. यामुळे हजारो प्रवासी तहान आणि भुकेने व्याकूळ झाले. आम्ही प्रवाशांना मदत करायचे ठरवले. गुपचूप घरातील जेवण, काही पदार्थ आणि पाणी घेऊन आम्ही कसेबसे रेल्वेपर्यंत पोहचलो. वडील घरात नव्हते. आम्ही गुपचूप घरातील जेवण, खाद्यपदार्थ पिशवीत भरले. सोबत पाणीही घेतले आणि ३०० मीटरवर असलेले स्टेशन गाठण्यासाठी निघालो. बाहेर पडताना आईने कुठे चाललात म्हणून विचारले... आम्ही इथेच आहोत असे खोटे सांगून वेळ मारून नेली. रस्त्यात पोलिसांनी अडवले. पुढे धोका असल्याचे सांगून घरी परतण्यास बजावले. मात्र, आम्ही कसेबसे रेल्वेपर्यंत पोहचण्यात यशस्वी झालो. रेल्वेतील काही जणांना आम्ही जेवण पुरवले तर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. एक महिला म्हणाली, तुम्ही हे आणले नसते तर माझ्या मुलीचे काय झाले असते, सांगता येत नाही. आम्ही ही मोहीम फत्ते करून घरी परतलाे तेव्हा आजोबा अगोदर खूप रागावले. नंतर त्यांनी आम्हाला मिठीच मारली. आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याचा सर्वात जास्त आनंद आजोबांनाच झाला.' 

 

अद्रिका आणि कार्तिकच्या वडिलांनी सांगितले, की त्यांनी या पुरस्कारासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज केला होता. यानंतर दिल्लीहून दोन अधिकारी मुरैनात आले. त्यांनी पडताळणी केली.अद्रिकाने २० हजार लोकांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षणही दिले आहे. ती तायक्वांदो ब्लॅक बेल्ट आहे. आतापर्यंत तिने २० हजार शाळकरी मुलांना हे प्रशिक्षण दिले आहे. म्हणूनच तिला 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानात ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...