आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The New Government Needs To Give Priority To Its Existence As Soon As Possible And Remove The Fog Of Dubious Doubt.

नवे सरकार लवकरात लवकर अस्तित्वात आणण्यास प्राधान्य देणे आणि दाट बनत चाललेले संशयाचे धुके दूर करणे गरजेचे आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात न भूतो... असा राजकीय पेच निर्माण झाला अाहे. प्रत्येक पक्ष या निकालाचा अर्थ आपापल्या सोयीने लावत असल्यामुळे सर्वत्र संशयकल्लोळ भरून राहिला आहे. राजकीय नेम साधत इतरांचा 'गेम' करण्यात माहीर असलेले शरद पवार आणि शिवसेनेच्या वतीने दर तासागणिक वेगवेगळे वाग्बाण सोडणारे संजय राऊत अशा दोघांकडे सध्या या खेळाची मुख्य सूत्रे आहेत. परिणामी, निवडणूकपूर्व काळात 'मी पुन्हा येईन' या राणा भीमदेवी थाटातील घोषणेने प्रसिद्धीचे अवकाश ज्यांनी व्यापले त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा फोकस काहीसा हटला अाहे. सरकार महायुतीचे बनणार की शिवसेना आघाडीसोबत जात वेगळी चूल मांडणार? मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा? काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार का? राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? भाजप अल्पमतातले सरकार स्थापन करणार का? राज्यात सरकार बनणार की थेट राष्ट्रपती राजवट लागणार? अशी प्रश्नचिन्हांची एक लांबलचक मालिकाच निर्माण झाली आहे. त्यातच प्रमुख राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींनाही ऊत आल्याने कुठले 'क्रॉस कनेक्शन' कधी जुळेल त्याचा नेम राहिलेला नाही. राज्याच्या चालू विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्याअगोदर सरकार स्थापन होणे गरजेचे असल्याने आता परिस्थिती अगदी हातघाईवर आली आहे. बुधवारी सकाळपासून विविध नेत्यांच्या राजकीय भेटीगाठींनी वेग घेतला असून संजय राऊत हे शरद पवारांना भेटायला जात असल्याची वार्ता येत नाही तोच ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतल्याची 'ब्रेकिंग न्यूज' येऊन थडकली. तत्पूर्वी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची घेतलेली भेटही लक्षवेधी ठरली. सत्तेचा वाटा आपल्या पदरात अधिकाधिक पडण्यासाठी मित्रपक्षांवरील दबाव वाढवण्याचा एकमेव उद्देश यामागे आहे. त्यातून संशयकल्लोळाचे हे राजकीय महानाट्य चांगलेच रंगत चालले असताना दुसरीकडे परतीच्या पावसाने राज्यातील शेतीचे अपरिमित नुकसान केले. हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या माऱ्याने अक्षरश: आडवे झाले आहे. भाजीपाला, फळपीक, कापूस असो की धान्य... कोणतेच पीक यातून सुटलेले नाही. सगळेच शेतकरी यात भरडले गेले. विशेषत: लहान शेतकऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्यासाठी आणि एकुणातच राज्याचा गाडा हाकण्यासाठी नवे सरकार लवकरात लवकर अस्तित्वात येणे नितांत गरजेचे ठरते. जनतेने महायुतीला बहुमत दिले असल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यावर ती जबाबदारी प्रामुख्याने आहे. तेव्हा मुख्यमंत्री कोण, सरकारमध्ये कुणाला किती वाटा वगैरे प्रश्नांवरून निर्माण झालेले मतभेद तातडीने दूर करून उभय पक्षाच्या नेत्यांनी नवे सरकार लवकरात लवकर अस्तित्वात आणण्यास प्राधान्य देणे आणि दाट बनत चाललेले संशयाचे धुके दूर करणे गरजेचे आहे.