आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुचं पुढचं पाऊल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरिता कुलकर्णी

समाजऋण फेडण्यासाठी वय, अनुभव, पैसा या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. गरजेची असते ती समाजऋणाची जाणीव. शून्यातून विश्व उभं करून भीक मागणारी मुलं, रस्त्यावरचीआजारी माणसं, निराधार, बेघरांना आसरा देणाऱ्या अनुचा हा थक्क करणारा प्रवास.  

लकामगार असणाऱ्या वडिलांचा पगार आणि घरातल्या खाणाऱ्या तोंडांचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे अर्धवेळ नोकरी करून अनंतअम्मा कृष्णय्यानं स्वत:चं एमएसडब्ल्यू पूर्ण केलं. कॉलेजच्या रस्त्यावर भीक मागणारी मुलं, कचराकुंडीतलं अन्न वेचणारे लोक दिसायचे. ते पाहून ती दु:खी व्हायची. या लोकांसाठी शिक्षणाचा उपयोग करण्याचा निश्चय तिनं केला. याच दरम्यान तिची ओळख आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रसाद मोहितेशी झाली. या दोघांनी एकमेकांसोबत २-३ वर्षे काम केलं. त्यानंतर माहेरची अनंतअम्मा कृष्णय्या अनु मोहिते झाली. समविचारी पतीच्या जोडीनं अनुनं अनाथ, फुटपाथवर भिक्षा मागणाऱ्या १० मुलांसोबत वंचितांची शाळा : एक पाऊल प्रगतीकडे’ प्रकल्पाला सुरुवात केली. आज या शाळेत २०० मुलं आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून भीक मागणाऱ्या मुलांना तिनं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. लग्नानंतर काही काळ प्रसाद आणि अनु दोघंही नोकरी करत होते. अनु रोज भिक्षेकरी, अनाथ,बेघर व फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना सकाळी शिकवायला जायची. दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी परत मुलांना शिकवणं. दरम्यान घरच्या वाटेेवरच्या आजारी लोकांची सेवा, औषधोपचार हे सुरूच होतं. मात्र नोकरीमुळे दुर्लक्षित लोकांना ती पुरेसा वेळ देऊ शकत नव्हती. नोकरीचा राजीनामा देत उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिनं खानावळ सुरू केली. यातून येणारा सर्व पैसा ती समाजासाठीच वापरायची. या काळात तिचं मानसिक खच्चीकरण करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र ती ठाम होती. या दरम्यानं अनु-प्रसादचं बाळ गर्भातच दगावलं. मुलगी जन्माला आली तर तिचं नाव प्रार्थना ठेवायचं ठरल्यानं या मुलीच्या स्मरणार्थ अनु आणि प्रसाद यांनी ‘प्रार्थना फाउंडेशन’ची स्थापना केली. विशेष म्हणजे इतक्या तान्ह्या बाळाचं देहदान करत अनुने एक उदाहरण घालून दिलं. अनुचं तान्हं बाळ दगावलं त्या वेळचा एक प्रसंग तर सर्वांचेच डोळे ओले करणारा आहे.  बाळ गेलं त्याचं दु:ख  करत न बसता त्या रात्रीही अनुनं सर्वांना मेसचे डबे पोहोचते केले. आपल्या दु:खामुळे कुणी उपाशी राहू नये हा त्यामागचा तिचा हेतू होता. 

समविचारी जोडी

अनु-प्रसाद दोघेही वेगवेगळ्या जातीतले होते. शिवाय प्रसाद एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातला होता. त्यांच्या लग्नाला बराच विरोध झाला. पण इथून पुढचं सर्व आयुष्य फक्त समाजासाठी व्यतीत करण्याची शपथ घेत दोघंही सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे लग्नातले सर्व विधी प्रसादच्या विधवा आईच्या हस्ते करून त्यांनी सुधारणेचं एक पाऊल टाकलं. लग्नाला येणारा खर्च त्यांनी अनाथ मुलींच्या नवे FD करून ठेवला. लग्नाच्याच दिवशी अवयवदान व देहदानाची शपथ घेतली.

प्रकल्पासाठी हक्काच्या जागेच स्वप्नं 

प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून अनु विविध समाजोपयोगी उपक्रम राबवते. रस्त्यावरच्या बेघर, अनाथ मुलं-मुली, वृद्धांसाठीचा ‘प्रार्थना बालग्राम’ हा निवासी प्रकल्प हक्काच्या जागेत उभा करण्याची अनुची इच्छा आहे. त्यासाठी अनु आणि प्रसाद यांनी स्वतःची पाच एकर जमीनजुमला, घरदार, सोनं... सगळं विकून प्रकल्पासाठी हक्काची जमीन घेतली आहे. मात्र पुढील वाटचाल करण्यासाठी त्यांना समाजामधल्या दानशूरांची गरज आहे...