आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोड्या करत असल्याने शिक्षकांनी दिली होती नोटीस, बचावासाठी लढवली शक्कल; चोरांनी उचलून नेत मारहाण केल्याचा बनाव करत कॉलनीत मागितली भीक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील ‘अाॅलीवर फाईंडस‌् अ हाेम’ या धड्याची कॉपी करत एका विद्यार्थ्याने चक्क वास्तव जीवनात तो धडाच उतरवण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांंचे धाबे दणाणले आहेत. शाळेत खूप खोड्या करत असल्याने शिक्षकांनी पालकांना बोलावण्यास सांगितल्याने त्यातून बचावासाठी मुलाने हा बनाव केला होता. ब्रिटीश कादंबरी लेखक चार्ल्स बिकेन्स यांच्या कादंबरीतून एक उतारा घेत हा धडा पाचवीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा धडा मुलांना शिकवण्यामागची ‘मॉरल ऑफ द स्टोरी’ नेमकी काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 


मुलाला भीक मागताना पालकाच्या मित्राने ओळखले 
बीड शहरातील एका इंग्लिश स्कूलमधील पाचवीच्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी २७ जूनला शाळेच्या मधल्या सुट्टीत भेळ खाण्यासाठी बाहेर गेला. दाेन अनोळखी व्यक्ती आल्या त्यांनी मला मारहाण केली आणि अंगावरील कपडे फाडून भीक मागायला लावली असे तो सांगत होता. मुलगा रस्त्यावर भीक मागत असताना त्याच्या पालकाच्या परिचितांनी त्याला ओळखले व पालकांना याची माहिती दिल्यानंतर पालकांनी त्याला घरी नेले.  घटनेनंतर पालकांनी त्वरित शाळा व शिवाजीनगर पोलिस स्टेशन गाठत घटनेची माहिती त्यांना दिली. 

 

असा आहे धडा 
‘ऑलीवर फाईंडस‌् अ हाेम’ या कथेचा पहिला धडा आहे. यात  अनाथाश्रमातील मुलगा तेथील व्यवस्थेला कंटाळून पळून जाताे. त्याला चाेरांची संगत मिळते . पण त्याला ते काेण आहेत हे माहीत नसत.  त्याचे कपडे फाडून चाेरटे त्याला चाेरीसाठी एका घरी घेऊन जातात. मात्र घरातील लाेक जागे हाेताच चाेरटे पळून जातात अन‌् अनाथ मुलगा तेथेच थांबताे. भीतीपाेटी ताे बाेलत नाही पण त्या घरातील लाेक त्याला दवाखान्यात घेऊन जातात. त्याची चाैकशी करून त्याचे पालकत्व स्वीकारत त्याला शाळेत पाठवतात.  त्या अनाथाला घर मिळते अशी कथा आहे.  दरम्यान, या कथेने कोणताही सुसंस्कार घडत नाही. उलट खोटं बोलून कसा बचाव करायचा हे शिकवले जाते, असे मत शिक्षण तज्ञ  विद्यासागर पाटांगणकर यांनी व्यक्त केले. 

 

बनाव असल्याचा असा झाला उलगडा
घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस व शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहणी केली तसेच परिसरात चौकशीही केली मात्र मुलाने केलेले वर्णन खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान पालकांनी विश्वासात घेत मुलाकडेच विचारणा केली असता आपल्या पाचवीच्या पुस्तकातील धडा वाचून आपण हे कृत्य केल्याचे मुलाने स्पष्ट केले. यानंतर पोलिस, पालक व शाळा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

शाळा प्रशासनाला धड्याविषयी कळवणार
मुळात अशा प्रकारच्या धड्याचा समावेश पाठ्यपुस्तकात का करण्यात आला, हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आता संबंधित शाळा प्रशासन तसेच पुस्तकाचे प्रकाशक रत्नसागर पब्लिकेशनला या धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश असावा का या विषयी चिंतन करण्याची विनंती करणार असल्याची माहिती शाळेने दिली.