आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहितांची संख्या गंभीर विषय ; यूपीएससीत देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अविवाहित मुलामुलींची संख्या हा गुंतागुंतीचा गंभीर विषय होऊन बसला आहे. विवाह व व्यवसाय या स्वतंत्र गोष्टी आहेत. आजकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणी एखादे नियुक्तिपत्र हाती पडल्याशिवाय लग्न करत नाहीत. ही चुकीची विचारसरणी वाटते. विवाह व काम अथवा परीक्षा या स्वतंत्र गोष्टी आहेत. विवाहाकडे ही सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर मानसिकदृष्ट्या सुरक्षित होऊन आपोआपच ताण व्यवस्थापन होते. आपल्याला आधार देणारा जोडीदार मिळतो, हा विचारदेखील विशिष्ट उंचीचे पद गाठू इच्छिणाऱ्या तरुणांनी लक्षात ठेवावे, असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशात १६व्या व राज्यात पहिल्या आलेल्या तृप्ती दोडमिसे यांनी व्यक्त केले. 
यूपीएससीच्या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात मला यश न मिळाल्याने माझा नवरा अक्षरश: रडला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. पुण्यात पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दोडमिसे बोलत होत्या.


त्या पुढे म्हणाल्या, मराठी माध्यमामुळे एखाद्या विषयाच्या डोक्यातील संकल्पना सुस्पष्ट होतात. शाळेत मराठीतून शिकल्यामुळे सोप्या इंग्रजी भाषेतील लिखाण परीक्षकांना भावले असावे. त्यामुळे सोप्या इंग्रजीत लिहिण्यामुळे मला संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले असावे. आपल्याला स्थानिक भाषेतच लोकांशी संवाद साधावा लागतो. अगोदरच्या कार्यालयीन कामाचा तसेच वैवाहिक आयुष्यातील प्रगल्भपणाचा अनुभव परीक्षेत कामी आला. विद्यार्थी नव्हे, तर एक व्यक्ती, अधिकारी म्हणून उत्तर लिहिण्याची पद्धत उपयोगी पडली. स्पर्धा परीक्षेत खूप स्पर्धा असल्याने खूप त्रास होतो, पण ती एक स्पर्धा आहे. मी जगलेली उदाहरणे परीक्षेत पेपरमध्ये उतरवली, असेही दोडमिसे यांनी या वेळी सांगितले.  

 

खासगी क्षेत्राप्रमाणे प्रशासन व्यवस्थेतही स्पर्धा हवी
खासगी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना प्रशासकीय सेवेत सामावून घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा एक चांगल्या प्रकारचा प्रयोग आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर आणखी शिस्त येईल. तसेच  या प्रयोगामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांत स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे याकडे चांगला प्रयोग म्हणून पाहता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही सध्या कामाबाबात स्पर्धा हवीच आहे. यामुळे अशी भावनाही दोडमिसे यांनी व्यक्त केली.