आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी, अपहरणप्रकरणी अभिनेत्रींसह एटीएसच्या पीएसआयवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उस्मानाबाद व दुबई येथील दाेन अभिनेत्रींसह पुणे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पाेलिस उपनिरीक्षकासह चौघांवर खंडणीसाठी अपहरण करून १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 
पाेलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे, राम भरत जगदाळे (रा. पुणे) आणि अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) आणि अभिनेत्री सारा श्रावण उर्फ सारा गणेश सोनवणे (रा. मुंबई, सध्या दुबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी राम भरत जगदाळे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. 


हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी राम भरत जगदाळे याच्या सहकारनगर येथील ऑफिसमध्ये घडला. तक्रारदार व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. आरोपींनी संगनमत करून वानवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेला विनयभंगाचा गुन्हा मिटवण्यासाठी राम जगदाळे याने सुभाष यादव यांना कार्यालयात बोलावून घेतले. तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना तीन तास थांबवून रोहिणी माने हिचे पाय धरून माफी मागण्यास लावली व त्याचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये एटीएसचे पाेलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे यांनी स्वीकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने राम जगदाळे, अमोल व रोहिणी यांनी संगनमत करून साराच्या मार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामीची धमकी दिली.

 

तक्रारदार व अभिनेत्री चित्रपटातील कलाकार   
तपास अधिकारी गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यादव आणि रोहिणी माने यांनी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रोल नं. १८ चित्रपटात अभिनेता व अभिनेत्री म्हणून काम केले आहे. अभिनेत्री राेहिणी हिने सुभाष यादव याने विनयभंग केल्याची तक्रार वानवडी पाेलिस ठाण्यात दिली हाेती. रोहिणीची सारा सोनवणे ही मैत्रीण आहे, तर अटक करण्यात आलेला आरोपी राम जगदाळे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.