आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत भाजपच्या पराभवाचा एकच मार्ग...गो वुईथ पीपल : डी. राजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बदलत्या राजकीय परिस्थितीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात तगून आहे. महाराष्ट्रात भाकप विधानसभेच्या १६ जागा लढवत आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे माजी खासदार डी. राजा यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट केले. ते म्हणाले, यंदाच्या निवडणुकीसाठी आमचा अजेंडा स्पष्ट आहे. भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना पराभूत करणे, हा भाकप व एकुणच आमच्या डाव्या पक्षांसमोरचा मुख्य कार्यक्रम आहे. तसेच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात पर्यायी राजकारणाचा उदय व्हावा, असा डाव्या पक्षांचा उद्देश आहे. त्यांच्याशी झालेली चर्चा अशी...

प्रश्न : विधानसभेतला प्रचार राष्ट्रीय मुद्द्यांभोवती फिरणे योग्य आहे?
डी. राजा : नाही. काश्मीरमधून ३७० कलम हटवल्याचा मुद्दा प्रचारात येणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी इथले शेतकरी नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढतात. तरी, शेतकऱ्यांचे मुद्दे प्रचारातून गायब होतात? याचा अर्थ भाजपची 'सबका साथ सबका विकास' घोषणा खोटी आहे. भाजप केवळ कॉर्पोरेट हाऊससोबत आहे. किसान, मजदूर यांच्यासोबत नाही.

प्रश्न : रोजगाराची स्थिती बिकट होत जाण्याच्या काळात डाव्यांना उभारी मिळेल?
डी. राजा : मुद्दा डाव्या पक्षांच्या स्पेसचा नाही. रोजगारासंबंधी आमची पूर्वीपासून कमिटमेंट राहिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांची वाढ व्हावी, अशी डाव्यांची कायम मागणी राहिली आहे. सरसंघचालक मोहन भागवत हिंदू राष्ट्राबाबत बोलतात. पण परकीय गुंतवणूक, वाढती निर्गुंतवणूक, बँकांचे विलीनीकरण याबाबत ते काहीच बोलत नाहीत. मुंबईतल्या पीएमसी बँकेचे काय झाले? त्यावर भाजपचे कोणीच काही बोलत का नाही?

प्रश्न : धर्मनिरपेक्ष पक्ष वेगळे का लढत आहेत?
डी. राजा : राज्यात डाव्या पक्षांची आघाडी कायम आहे. भाजपला व तिच्या मित्रपक्षांना हरवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एका प्लॅटफाॅर्मवर यायला हवे होते. आम्ही तसे प्रपोज केले होते. पण, ते झाले नाही. भाकप १६ जागा लढवत आहे. आमचे उमेदवार नाहीत, तिथे आम्ही धर्मनिरपेक्ष पार्टीला पाठिंबा देत आहोत.

प्रश्न :जातीय गणितांचे महत्व वाढले आहे.
डी. राजा : 'कास्ट' हा भारतातलाच कळीचा प्रश्न आहे. जातीय भेदभावांना डाव्या पक्षांनी कायम विरोध केला असून सामाजिक न्यायाच्या भूमिकेचे आम्ही आग्रही आहोत. हे खरं आहे, निवडणुकांत जातीय अस्मितांचा वापर वाढतो आहे. त्यावर सर्वच पक्षांनी चिंतन केले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची यात मोठी भूमिका असावी.

प्रश्न : काँग्रेस व राहुल गांधी हे भाजपला टक्कर देऊ शकतील ?
डी. राजा : होय. हे मान्य केलं पाहिजे की, काँग्रेसमध्ये बऱ्याच समस्या आहेत. पण, काँग्रेस हा भारतातला एकमेव सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष असा पक्ष आहे. काँग्रेस कॅन फाइट, काँग्रेस शुड फाइट. भाजपविरोधी लढ्यात काँग्रेसने इतर पक्षांना सहभागी करून घेतले पाहीजे.

प्रश्न : डावे पक्ष अजूनही कामगारवर्गीय लढ्यातच मग्न आहेत?
डी. राजा : भाकपची आॅल इंडिया किसान सभा ही मोठी शेतकरी विंग आहे. ती भारतभर शेतकरी लढे उभे करते. तुम्ही म्हणता, ते खरं आहे. डाव्या पक्षांनी आणखी शेतकऱ्यांत काम करायला पाहिजे.

प्रश्न : भाजपच्या पराभवासाठी डाव्यांकडे प्लॅन आहे ?
डी. राजा : भाजप व आरएएसच्या पराभवाचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे, गो वुइथ पीपल… तुम्ही भाजपला हरवू शकता, याबाबत जनतेचा आत्मविश्वास वाढवायला हवा. विरोधी बाकावरचे पक्ष जनतेला अधिक उत्तरदायी बनले पाहिजेत. धर्मनिरपेक्ष पक्षांनी अधिक विश्वासपात्र बनले पाहिजे. तरच भाजपचा आणि आरएसएसचा पराभव शक्य आहे.

प्रश्न : भाजपचा जाहीरनामा तुम्ही वाचलात का?
डी. राजा : हो वाचला. आणि मला सांगायला खेद वाटतो… महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षात त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सावरकर यांना भारतरत्न द्यावा, अशी त्या जाहीरनाम्यात मागणी करण्यात आली आहे. उद्या महाराष्ट्र भाजप महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या सन्मानाचा प्रस्ताव सुद्धा ठेवेल. तो दिवस दूर नाही.

प्रश्न : डाव्या पक्षांच्या मतांचा टक्का घसरत चालला आहे?
डी. राजा : राजकारण फक्त मतपेटीतच नसते. मतदारांच्या जाणिवा-नेणिवा बदलायला हव्या असतात. तरच राजकारण पुढे जाते. डावे पक्ष एक अजेंडा घेऊन काम करत असतात. भाजपच्या सांस्कृतिक राजकारणाला थोपवण्याची डाव्या पक्षाकडे क्षमता आहे. आमचा व्होट शेअर पाहताना ही ताकद लक्षात घ्या.