राजकीय / विरोधी पक्ष असमर्थ, जनतेनेच पुढाकार घेतला!


लोकांनी पुढाकार घेतल्याने चित्र पालटलं

दिव्य मराठी

Oct 26,2019 09:16:00 AM IST

कुमार सप्तर्षी
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची तुतारी वाजली, त्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपत प्रवेश करायला सुरुवात केली. त्यामुळे समोर लढणारा माणूस लंगडा झालाय, असं चित्र होतं. आणि लंगडं काय लढणार, अशीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होती. पण हळूहळू ते चित्र पालटलं. प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यातही जनतेला लक्षात आलं, राजकीय पक्ष लढाईसाठी असमर्थ आहेत. तेव्हा जनताच पुढे आली. आणीबाणीच्या वेळेला असं झालं होतं. तत्कालीन जनता पक्ष फार शक्तिशाली नव्हता. पण जनतेनं पुढाकार घेतला. कारण जनतेला लोकशाही हवी आहे.


लोकांनी पुढाकार घेतल्याने चित्र पालटलं. सत्तेचा गैरवापर होऊ नये, यासाठीच आचारसंहिता लागू होत असते. खास सत्ताधाऱ्यांसाठीच हे नियम असतात. या सत्ताधाऱ्यांनी तर आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या काळात ईडीच्या चौकशा चालू केल्या. खोटे प्रचार केले, अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल केला. चौकशीलाच गुन्हा दाखल असे म्हटले गेले. पण सत्ताधाऱ्यांचा डावच शरद पवारांनी पलटवून लावला. मीच ईडीकडे जातो, माझी चौकशी करा, असे आव्हान त्यांनी दिले. माणूस या पातळीवर त्रास देणं, लोकांना अजिबात आवडत नाही. अशा वेळी लोकशाहीचा आत्माच संपुष्टात येतो.

भाजपा सरकारच्या हाती २०१४ पासून पाच वर्षे होती. तेव्हाच काय कायदेशीर कारवाया करायच्या होत्या, त्या करायला हव्या होत्या. पण आचारसंहिता लागू झाल्यावर यांनी हा सर्व खेळ सुरू केला आणि हा खेळ अगदी साध्यातल्या साध्या ग्रामीण भागातल्या माणसाला समजतो. त्यानंतर शरद पवार महाराष्ट्रभर फिरले. विरोधी पक्षात कुणीतरी आहे. नेतृत्व पातळीवर पक्ष अगदीच बेवारशी झाले आहेत, हे चित्र पुसून काढलं. दोन्ही काँग्रेसकडून त्यांनी ठोस भूमिका निभावली. त्यांचं वय, भरपावसात घेतलेल्या सभा या सर्वांमुळे त्यांना चांगली सहानुभूती मिळाली. त्यामुळे चित्र पालटलं.
या निवडणुकीनं अनेक गोष्टी शिकवल्या. एखाद्या पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर त्यानं लोकांशी उर्मटपणे वागू नये. एक्सेस ऑफ पॉवर आर नॉट अलाउड इन डेमोक्रसी. फक्त लोक खूप हळूहळू प्रतिक्रिया देतात. अंतर्गत भांडणं, भावंडांची. ज्या दिवशी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तेव्हा अनेक छोटे छोटे राजे पांडवांकडे गेले.


पांडवांकडे स्वत:ची अशी फौज नव्हतीच. लोकशाहीत प्रत्येक पक्षाची स्टँडिंग फौज असते, असं गृहीत धरलं जातं. यंदा ज्या लोकांनी पक्षांतर केलं, ते इतके संधिसाधू होते, की त्यांनी व्यक्तिगत निष्ठेवरच फौजा तयार केल्या होत्या. म्हणून त्यांनी आपलं सगळं चंबूगबाळं घेऊन भाजपच्या तंबूत गेले. अशा प्रत्येक ठिकाणी जनता पुढे आली आणि जनतेने दिलेला कौल आपल्यासमोर आहे. माझ्या मते, लोकशाहीसाठी अत्यंत आरोग्यदायी अशी ही घटना घडलेली आहे.

X
COMMENT