आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या प्रकरणाचा निकाल; 99% मुस्लिम फेरविचार याचिकेच्या बाजूने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करावी असे ९९ टक्के मुस्लिमांचे मत आहे, असे अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाने (एआयएमपीएलबी) रविवारी म्हटले आहे.

मंडळाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी म्हणाले की, बहुतांश मुस्लिमांची फेरविचार याचिका दाखल करण्याची इच्छा आहे. मुस्लिमांतील बहुतांश जण फेरविचार याचिकेच्या विरोधात आहेत, असे कोणी समजत असेल तर ते चुकीचे आहे. आपली याचिका फेटाळली जाईल, असे काहींना वाटत आहे. पण याचा अर्थ आम्ही याचिका दाखल करणार नाही असे नाही. तो आमचा कायदेशीर हक्क आहे. निकालात अनेक परस्परविरोधी बाबी आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाचा शेवट व्हायला नको का, या प्रश्नावर रहमानी म्हणाले की, ज्या लोकांचे मशिदीशी काहीही देणे-घेणे नाही आणि जे लोक घाबरलेले आहेत ते दुसऱ्यांनाही फेरविचार याचिका दाखल करण्यास रोखत आहेत. बुद्धिजीवी हा मुद्दा उपस्थित करतात, पण मुस्लिम समुदायाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही व्यावहारिक योजना नव्हती. त्यांनी समुदायासाठी काय केले आहे हे त्यांना विचारण्याची गरज आहे. मुस्लिमांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळेच फेरविचार याचिका दाखल केली जात आहे. पण अयोध्येवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा विश्वास कमजोर झाला आहे.

अयोध्या खटल्यात एआयएमपीएलबी पक्षकार नाही. मात्र, आपण ९ डिसेंबरपूर्वी फेरविचार याचिका दाखल करू, असे मंडळाने याआधीच स्पष्ट केले आहे. अयोध्याप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ९ नोव्हेंबरला निकाल दिला होता. वादग्रस्त जागी सरकारने ट्रस्टमार्फत मंदिर उभारावे आणि मशिदीसाठी अयोध्येत पर्यायी पाच एकर जागा द्यावी, असे निकालात नमूद करण्यात आले होते. अयोध्या प्रकरणात मुख्य पक्षकार असलेल्या सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने मात्र फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा घ्यावी की नाही याबाबतचा निर्णय अद्याप बाकी आहे.

विभाजनवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : नक्वी

केंद्रीय अल्पसंख्याक कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर एआयएमपीएलबी आणि जमियत-उलेमा-ए-हिंद देशात विभाजनवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, मुस्लिमांसाठी बाबरी नव्हे, तर समानता हा मोठा मुद्दा आहे. त्यांना शिक्षण, आर्थिक-सामाजिक क्षेत्रात उत्थानासाठी समानता हवी. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नक्वी म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत बनवण्याचे आणि न्यायालयांत जाण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एकमताने दिलेल्या निकालामुळे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्रयत्न केले जावेत.

फेरविचाराची मागणी करणे ही दुटप्पी भूमिका : श्री श्री

कोलकाता : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे की, 'अयोध्येवर आलेल्या निकालावर फेरविचार करावा अशी मागणी करणाऱ्या मुस्लिम वैयक्तिक कायदे मंडळाची आणि जमियत-उलेमा-ए-हिंद यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. आज हिंदू आणि मुस्लिमांनी सोबत येऊन देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायला हवी. हा वाद खूप आधीच संपुष्टात यायला हवा होता. देश सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.' अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थता पॅनलचे श्री श्री रविशंकर हे सदस्य होते.