Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | The pain of the woman in Pimpalgaon Renukaai, the fury against the administration

जिल्हाधिकारी साहेब, कर्जमाफी द्या, नाही तर मला इच्छामरण तरी द्या हो.., पिंपळगाव रेणुकाई येथील महिलेची व्यथा, प्रशासनाविरोधात रोष  

प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 08:42 AM IST

चार वर्षापूर्वी शेतीसाठी एचडीएफसी बँकेकडून दोन लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते.

 • The pain of the woman in Pimpalgaon Renukaai, the fury against the administration

  पिंपळगाव रेणुकाई- शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याचा अद्यापही लाभ झालेला नाही. पिंपळगाव रेणुकाई येथील महिलेच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. मात्र त्यांच्या पतीने चार वर्षापूर्वी घेतलेल्या कर्जासाठी बँकेने वसुलीचा तगादा लावला आहे. उत्पन्नाचे काेणतेच साधन नाही, त्यातच घरात उपवर कन्या अशा परिस्थितीही या महिलेने कर्जमाफी मिळेल या आशेपोटी १ लाख ६० हजार रुपये भरले. परंतू बॅँकेचा ससेमीरा अद्यापही कायम आहे. त्यामुळेच संबंधीत शेतकरी महिलेने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन दिले. त्यात बँकेचे कर्ज माफ करा अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी केली.

  मंगलाबाई देशमुख यांचे पती विठ्ठल बाजीराव देशमुख यांनी चार वर्षापूर्वी शेतीसाठी एचडीएफसी बँकेकडून दोन लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. यात देशमुख यांनी नियमितपणे दोन हप्ते देखील भरले होते. मात्र २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर आपले कर्ज माफ होईल असे मंगलाबाई यांना वाटले होते मात्र त्यानंतर काही दिवसातच बँकेने कर्जवसुलीचा तगादा सुरु केला. कर्ज भरले नाही तर शेतीची जप्ती करु अशीही धमकी त्यांना देण्यात आली. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यात आपले कर्ज माफ होईल असे त्यांना वाटले होते मात्र त्यासाठीही त्या पात्र ठरल्या नाही. तुम्ही १ लाख ६० हजार रुपये भरले तर तुमचे कर्ज माफ होईल असेही बँकेच्या प्रतिनिधींनी मंगलाबाई यांना सांगितले. उसणवारी करुन ही रक्कम बँकेत भरली. मात्र त्यानंतरही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. बँकेच्या प्रतिनिधींनी पुन्हा त्यांच्याकडे येऊन कर्ज भरा अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेतजमीन आहे. मात्र दुष्काळामुळे शेती पिकली नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कर्जमाफी द्या किंवा इच्छामरणाची परवानगी तरी द्या अशी मागणी केली आहे.

  मुलीच्या लग्नाची चिंता
  दोन वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. दोन मुले व तीन मुली असा माझा परिवार आहे. घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीत काहीच उत्पन्न मिळाले नाही. मुलगी उपवर झाली असुन तिचे लग्नही करायचे आहे मात्र हातात पैसे नसल्याने मुलीच्या लग्नाची चिंता सतावत आहे. मंगलाबाई देशमुख, शेतकरी महिला

  असे होते कर्जाचे स्वरूप
  मंगलाबाई यांच्या पतीने २०१४ मध्ये २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर देशमुख यांनी ६० हजार रुपयांचे दोन हप्ते असे १ लाख २० हजार रुपये भरले तर कर्जमाफीत आपल्या कर्जाचा समावेश होईल म्हणून पुन्हा १ लाख ६० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतरही त्यांना कर्जमाफी मिळाली नाहीच उलट वसुलीसाठी तगादा सुरु करण्यात आला आहे.

  पुन्हा सुरू झाला ससेमिरा
  त्या कर्जावर सुरक्षा म्हणून विमा काढते व त्या विम्याचा खर्चही कर्जदाराच्या नावे टाकते. कर्जदाराचे निधन झाले तर कर्जाची वसुली बँक विमा कंपनीकडून करते अशी माहिती मंगलाबाई देशमुख यांना मिळाल्यावर त्यांनी आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन बँक गाठली. मात्र बँकेने ते पत्र स्विकारलेच नाही असे असे या महिलेने सांगितले.

Trending