आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - शेतातली काळी माती आणि पाणी भरणाऱ्या महिलांचे चेहरे पांढरेसफेद. हेलपाटे घालून उन्हानं रापलेले चेहरे, घागरी वाहून टाळूवरचे गेलेले केस, कडेवरच्या कळशांनी वाकलेल्या कमरा आणि चार-सहा घागरींच्या सायकली ओढून श्वास घेताना लागणारी धाप. कुणाच्या नाकातून रक्त येतंय तर कुणाला पाळीच्या काळात रक्तस्त्राव होतोय. पाणी भरताना पडल्याने कुणाच्या मांडीला मुका मार लागलाय तर घागर डोक्यावर पडल्यापासून कुणाच्या माथ्यातून कळा येताहेत. खोल गेलेले हातपंप हापसून कुणाच्या छातीत सणक भरलीए तर कुणी विहीरीत पडल्यापासून पाठ ठणकतेय. या तक्रारी आहेत मतदारसंख्येने ८ लाख ७७ हजार असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महिला मतदारांच्या. मात्र हा मुद्दा कुणाच्याही प्रचारात नाही. निवडणुकीत फक्त चर्चा आहे, ‘हवा कुणाची राणादादा’ची किंवा ‘फिर एक बार मोदी सरकार’ची!
१७३० लोकसंख्येच्या मार्डी गावात १ हजार ५७ मतदार. यात निम्म्या महिला. पण निवडणुकीत ना त्यांना स्थान आहे, ना त्यांच्या प्रश्नांना. पाच दिवसांनी पाणी येणाऱ्या या गावात महिलांचे चार दिवस रांगेत वाट बघण्यात जातात, पाणी आल्यावर रात्रभर पाणी भरण्यात आणि पाणी नसेल तेव्हा गावातील निजामकालीन विहिरीच्या ८५ पायऱ्या चढून पाणी भरण्यात जातात.
गावातल्या आशा वर्कर कांचन सरोदे सांगतात, गेल्या तीन महिन्यांपासून महिला गोळ्या खाऊन खाऊन पाणी भरताहेत. महिनाभरच्या गोळ्या आठ दिवसातच संपतात. दररोज पाच-पाच महिला पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी आणि डोकं दुखीसाठी गोळ्या घेण्यासाठी येतात. तरुण महिलांच्या छातीत दुखण्याच्या तक्रारी अधिक आहेत तर वयस्कर महिलांच्या गुडघे दुखी आणि पोटऱ्या दुखण्याचं. पण गोळ्या घेऊनही त्यांना पुन्हा लगेचच उन्हात पाणी भरण्यासाठी जावं लागतं.
अंजना रसाळचं वजन ३० किलो आहे, त्या एकावेळी पाणी वाहतात चार घागरी. एक घागर १५ लिटरची. म्हणजे ६० लिटर. अशा दिवसातून कमीत कमी सहा चकरा. वरून ४०- ४२ डीग्री तापमानाच्या झळा आणि सायकलवरून चार-सहा घागरी चढावरून लोटल्यानं त्यांना श्वास घेताना धाप लागते.७० वर्षांच्या कोंडाबाई मिसाळ पाणी भरताना पडल्या तर त्यांच्या कमरेचं हाड मोडलं. मनिषा मिसाळच्या कुटुंबात सात माणसं आहेत आणि चार जनावरं. पण पाणी भरणाऱ्या त्या एकट्याच. दिवसभरात त्यांना ४० घागरी पाणी भरावं लागतं. उन्हात पाणी वाहून वाहून त्यांच्या नाकातून रक्त येतंय. करणारं दुसरं कुणी नसल्याने त्यांनी हे घरी सांगितलंही नाही आणि पैसे नसल्याने उपचारही केले नाहीत. घागरी उचलताना पार्वती भोपळेच्या मानेत कळ येते आणि डोळ्यापुढे अंधारी. शांताबाई लोखंडे दोन दिवसाचे कपडे जमवून तळ्यावर धुण्यासाठी गेल्या, तिथे पाय घसरून पडल्या तर १० हजार खर्च झाला. खुदावाडी गावातल्या किरण राठोडला अंगावरून खूप रक्तस्त्राव होतो. दर महिन्याला ६०० रुपयांची औषधं घ्यावी लागतात. पण पाण्यामुळे विश्रांती मिळत नाही. हातपंपाचं पाणी खोल गेल्याने हापसून हापसून छातीच्या बरगड्या दुखतात. हंंडा उचलताना छातीत कळ येते. प्रियंका राठोड पाणी भरतानाच चक्कर येेऊन पडली. कविता जाधव पाय घसरून विहिरीत पडली. महिलांच्या आरडाओरड्यानं शेतमालकाने वेळीच प्रसंंगावधान दाखवलं म्हणून तिचा जीव वाचला. पण पाठीला मुकामार बसलाच.
लोहारा व तुळजापूर तालुक्यांतील प्रत्येक गावात हीच परिस्थिती. मार्डी, भवानी तांडा, लोहारा खुर्द, खुदावाडी. फक्त गावांची नावं बदलतात. चित्र मात्र सारखंच. कोरडी भकास शेतं, उन्हात करपणारं गवत, तहानलेलं जनावरं आणि पाण्याच्या घागरी वाहणाऱ्या बायका-मुलं. तुळाबाई राठोड भवानीनगर तांड्याच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. भरली घागर घेऊन पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला तडा गेला होता. ५० हजारांचा खर्च करून उपचार केले. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न प्रचारात नाही. पण मार्डी गावातल्या दुसऱ्या वॉर्डातून मतदान झालं नाही, या रागाने त्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. अंजनानं वर्मावर बोट ठेवलं. ‘समजा आज आम्ही कुणाजवळ पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोललो तर उद्यापासून आमचं बाकीचंही सारंच बंद होईल’, अशी तिला भिती वाटते. दाखल्यांसाठी, अर्जांसाठी सारखं पुढाऱ्यांकडे जावं लागतं. त्यामुळे विरोधात बोलता येत नाही.
‘हिरवी भाजी केव्हा खाल्ली?’ या प्रश्नावर तिचं उत्तर होतं ‘दिवाळीत’...
खुदावाडीची अनिता राठोड म्हणाली, डिसेंबरमध्ये... हिरवी भाजी आणि फळं, पोषक आहारातील अत्यावश्यक घटक. पण दुष्काळानं होरपळणाऱ्या या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून फक्त ज्वारीची भाकरी आणि डाळीत पाणी असाच आहार सुरू आहे. ‘25 रुपयांची एक चापटी (पाव किलो) डाळ आणायची आणि आठवडाभर पुरवायची.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.