आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Parents Of The Accused Say Once They Were Allowed To Talk To Their Children, Did They Really Do That?

आरोपींचे पालक म्हणतात- एकदा तरी मुलांशी बोलू द्यायला हवे होते, खरेच त्यांनी असे काही केले का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुले घरातून जिवंत गेली, नंतर मृतदेहच पाहायला बोलावले; आरोपींच्या आई-वडिलांचा आरोप

मंदार जोशी 

गुडी गंडला (हैदराबाद)- हैदराबादपासून १८० किलोमीटर दूर गुडी गंडला गाव आहे. डॉ. दिशा खून व बलात्कार प्रकरणात याच गावातील तीन मुलांचे ६ डिसेंबर रोजी तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर केले. या घटनेची चर्चा देशभरात आहे. अधिकाऱ्यांच्या गाड्या चार दिवसांपासून चौकशीसाठी येतात. बंदोबस्तदेखील लागला आहे. तीन ते चार हजार वस्ती असलेल्या या गावाने हे पहिल्यांदाच पाहिले. २९ नोव्हेंबरला रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी मुलांना घरातून जिवंत नेले. त्यानंतर सहा डिसेंबरला सकाळी थेट मृतदेहच पाहायला बोलावले, असा आरोप एन्काउंटरमध्ये मारले गेलेल्या आरोपींच्या आई-वडिलांनी केला. एकदा तरी आम्हाला विचारू द्यायला पाहिजे होते, की त्यांनी खरंच काही केले का?, असे त्यांचे म्हणने अाहे.
जिलू शिवा, जिलू नवीन व चनकेश्वर चिंतनाकुंटा हे नारायणपेठ जिल्ह्यातील गुडी गंडला गावातील. मोहम्मद आरेफ या गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या जस्लर या गावातील. चौघांचे कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीत राहतात. इंदिरा गांधी आवास योजनेतून एका खोलीचे घर मिळाले त्यातच ते राहतात. मुलाचे पोलिसांनी एन्काउंटर केले. तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार का? असे विचारताच हे लोक रडायला लागतात. ‘साब शाम को क्या खाने का इसकी पडी.. कोर्ट में जानेके लिये पैसे नही, जो कमाते थे वो बच्चेच कमाते थे अब क्या करे’… असे विचारतात.मोहंमद आरेफ 
 
मोहंमद आरेफ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा चौघात सर्वात मोठा म्हणजे २६ वर्षांचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचे वडील मजुरी करतात. १६ वर्षांच्या बहिणीला आरेफनेच कुठल्या तरी निवासी शाळेत टाकले आहे. तीन वर्षांपासून तो हैदराबादच्या सेठकडे ट्रक चालवण्याचे काम करतो, असे त्याचे वडील हुसेन मोहंमद सांगतात. आमचा मुलगा असे कधीच करणार नाही. मोठ्या लोकांच्या मुलांनी गुन्हा केला तर काही होत नाही. आमच्या मुलांनी काय केले त्याचा तपासही पूर्ण न करता त्यांचे एन्काउंटर केले. 

जिलू शिवा


जिलू शिवाला पोलिसांनी १८ वर्षांच्या पुढे दाखवले आहे. घरी त्याचे वडील राजप्पा यांनी त्याची सातवीतील टीसी दाखवली. त्यावर २००२ अशी जन्म तारीख आहे. शिवाला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. त्याचे वडील दुसऱ्यांच्या बकऱ्या चारण्यासाठी घेऊन जातात. ते पंधरा-पंधरा दिवस बाहेरच असतात. दोन दिवसात पैसे घेऊन येतो असे म्हणून घरातून गेला होता. मात्र, तो तसाच परतला. २९ नोव्हेंबरला रात्री पोलिसांनी पकडून नेले. पुन्हा भेटू दिले नाही.चन्नकेश्वर


चन्नकेश्वरची बायको १७ वर्षांची रेणुका सहा महिन्यांची गर्भवती आहे. आपल्या नवऱ्याने खरंच असे केले असेल का? आपल्या होणाऱ्या बाळाचे काय होणार. माहेरी जावे तर आई-वडील नाहीत. एका कोपऱ्यात ती शून्यात पाहत बसलेली. अधिकारी किंवा माध्यमाचे प्रतिनिधी समोर आले की चन्नकेश्वरची आई जयम्मा रेणुकाला समोर करते. माझा मुलगा अल्पवयीन होता. असे म्हणत तीसुद्धा मुलाची टीसी आणि आधार कार्ड दाखवते. त्याच्यावरही जन्मतारखा वेगवगळ्या. जय्यमा खूप आवेगाने बोलत होत्या, रडत होत्या. रेणुका फक्त तिच्याकडे पाहत राहते. 

जिलू नवीन


घरात बारा-तेरा वर्षांची मुलगी. लोकांना पाहताच घरात पळते. वडील नाही. २००६ सालीच कॅन्सरने वडिलांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपासून नवीन ट्रकवर क्लीनर म्हणून काम करत होता. नवीनची आत्या घरी आलेली आहे. मृतदेह कधी मिळतील. अंत्यसंस्कारासाठी पोलिस २५ हजार रुपये देणार आहेत. असे काही लोकांनी सांगितले त्याचाच आधार होईल, असे नवीनच्या आत्याने सांगितले. 

मूळ घटनेचा तपास बाजूलाच  


डॉ. दिशा खून आणि बलात्कार प्रकरणाच्या तपासाचे काय झाले, याचे पोलिसांकडे काहीही उत्तर नाही. ज्यांच्याकडून पुरावे आणि वैद्यकीय तपासणी करायची होती ते आरोपी आणि पीडिता दोघांचाही मृत्यू झाला. आता पुढे या तपासाचे नेमके काय होणार हे कुणालाच माहिती नाही. आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मात्र तेलंगण पोलिस पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. हैदराबादचे राच्चाकुंडा भागाचे पोलिस आयुक्त महेश भागवत या प्रकरणात चौकशी करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख आहेत. 

बातम्या आणखी आहेत...