आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ अधिकाऱ्यांची निवड कोणी केली माेदींनी स्पष्टीकरण देण्याची केली मागणी:शरद पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘दोन दिवसांपासून केंद्र सरकार रात्रंदिवस काम करत आहे. त्यांनी ‘सीबीआय’बाबत निर्णय घेतले, पण पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. सीबीआय अर्थमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही. पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या विषयावर पंतप्रधान बोलले असते तर देशाला अाश्वस्त करण्याचे काम अधिक चांगले झाले असते. सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांची निवड मनमोहनसिंग सरकारने नव्हे, तर याच सरकारने केली, त्यामुळे माेदींनी या प्रकरणात भाष्य करावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी अाैरंगाबादेत बोलताना केली. 


पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘सीबीआयमध्ये अधिकाऱ्याची निवड करताना आपले शेजारी राज्य गुजरातेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्याचा मलाही आनंद आहे. मोदी तेथे 15 वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेथील अधिकारी घेतले, याचा अर्थ त्यांनी त्या अधिकाऱ्यांबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे ते अधिकारी का निवडले याचे स्पष्टीकरण त्यांनीच दिले पाहिजे. मोदींनी मौन सोडावे,’ अशी मागणीही त्यांनी केली. 


राज्यातील नेतृत्व बालिश : ‘राज्य सरकारने माणसे, जनावरे वाचावीत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढील सात महिने भयंकर असतील. त्याची तजवीज आताच करून ठेवावी. अन्न सोडले तर या सत्ताधाऱ्यांचा पाणी, शेती, जनावरे याच्याशी काहीही संबंध येत नाही. मुख्यमंत्रिपदाचा मला अवमान करायचा नाही, परंतु हे नेतृत्व ‘बालिश’ अाहे,’ अशी टीका फडणवीस यांचे नाव न घेता पवारांनी केली. तरीही ही वेळ शब्दच्छल, टीका-टिप्पणी किंवा राजकारण करण्याची नसल्याचे ते म्हणाले.

 

नेतृत्वाला अनुभव नसेल तर हरकत नाही; परंतु त्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, असा सल्ला देतानाच सरकार हे सर्वज्ञ असल्यासारखे वागत असल्याचा टाेला पवारांनी लगावला. जलयुक्त शिवार योजनेचा उदोउदो होत असला तरी त्याबाबतचे अहवाल गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, पवार गुरुवारी मुंबईकडे  जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले  असता त्यांची येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी भेट झाली. त्यानंतर दोघांनी विमानात एकमेकांच्या  बाजुला बसून प्रवास केला. दोघांच्या प्रवसामुळे राजकीय तर्क वितर्काला उधाण आले. मनसेला आघाडीत सामावून घेण्याबाबतही गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

 

50 टक्के जागा हव्यात, 42 जागांवर मतैक्य 

‘लोकसभेला काँग्रेससोबत आघाडी होणार हे केव्हाच स्पष्ट झाले आहे. आता जागावाटपाचा तिढाही लवकरच सुटेल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीला ५० टक्के जागा हव्या आहेत. त्यातील ४२ जागांवर आमचे मतैक्य झाले आहे. काही जागांची अदलाबदल करायची आहे. त्यावर राज्यपातळीवर निर्णय घेण्यात येईल. तेथे मतैक्य झाले नाही तर मी स्वत: काँग्रेस अध्यक्षांसमवेत बसून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

 

रामजपाचे स्वागत, पण ते राज्याच्या हिताचे नाही 

भाजपपाठोपाठ आता शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलला अाहे. यावर पवार म्हणाले, ‘कोणी रामाचे नाव घेत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु पुरोगामी राज्यात देवाधर्मावर मते मागणे हे आपल्या हिताचे नाही.’

 

दुष्काळामुळे निवडणुका थांबणार नाहीत 

राज्यात आताच भीषण दुष्काळ आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्याची तीव्रता आणखी असेल. तेव्हा या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत का, असा प्रश्न केला असता लोकशाहीत निवडणुका टाळता येत नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...