Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | The police will be kept memory of Shahid police in the book

नक्षलविरोधी लढ्यातील धारातीर्थी पोलिसांच्या स्मृती पुस्तकरूपाने जपणार, राज्य पोलिसांचा पुढाकार, १९४ शहीद पोलिसांची माहिती केली संकलित, चकमकीचे प्रसंगही रेखाटणार ! 

रमाकांत दाणी | Update - Feb 12, 2019, 08:17 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयत्न 

 • The police will be kept memory of Shahid police in the book

  नागपूर- महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा सामना करताना आजवर १९४ पोलिस धारातीर्थी पडले. या लढ्यातील शहीद पोलिसांची कामगिरी चिरंतन स्मरणात राहावी, यासाठी त्यांच्या कामगिरीची दखल अनोख्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न राज्य पोलिस दलाकडून सुरू आहे. या पोलिसांच्या कामगिरीची गाथा सांगणारी पुस्तिका नक्षलविरोधी अभियानाकडून तयार केली जात आहे.

  १९८०-९० च्या दशकात गडचिरोली आणि गोंदियासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत नक्षलवादी चळवळीची पाळेमुळे रुजायला सुरुवात झाली. नक्षलवाद्यांच्या कारवाया हिंसक व्हायला सुरुवात झाल्यावर पोलिस दलातही व्यापक बदल करावे लागले. हिंसक कारवायांचा सामना करण्यासाठी जिल्हा पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल आणि इतर निमलष्करी दलांची मोठी तैनाती करावी लागली. प्रदीर्घ काळ चालू असलेल्या संघर्षात आजवर १९४ पोलिसांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी राज्य शासनाकडून तत्कालीन धोरणानुसार मदत आणि पुनर्वसनाच्या योजना राबविल्या गेल्या. तथापि, शहीद पोलिसांची कामगिरी कायमस्वरुपी स्मरणात राहावी, त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा मिळावा, या दृष्टीने नक्षलविरोधी अभियान कार्यालयाकडून शहीद पोलिसांच्या कामगिरीची गाथा सांगणारी पुस्तिका तयार होत आहे. "या पुस्तिकेसाठी सर्व १९४ शहिदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यांचा संपूर्ण परिचय व प्रत्यक्ष नक्षलवाद्यांशी चकमकीचा प्रसंग, या पुस्तिकेत रेखाटण्याचे प्रयत्न होणार आहेत', अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्याचे प्रयत्न
  "शहीद पोलिसांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीने पूर्वजांनी केलेल्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगावा, अशी आठवण या पुस्तक रुपाने त्यांच्याकडे राहील, असे उपमहानिरीक्षक शिंदे यांनी सांगितले. श्रद्धांजली पुस्तिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुस्तिकेला खुद्द मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची प्रस्तावना राहणार आहे. या कार्यक्रमात शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना निमंत्रित केले जाणार आहे.

  १९८८ मध्ये अकोल्यातील जवानाला प्रथम वीरमरण
  ८ जानेवारी १९८८ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरुमवाडा येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत राज्य राखीव पोलिस दलाचे जवान रमेश रामकृष्ण पागधुने यांना वीरमरण आले होते. मूळचे अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मंचपूर सावरा येथील रहिवासी असलेले रमेश पागधुने हे महाराष्ट्रातील नक्षलवाद विरोधी मोहिमेतील पहिले शहीद पोलिस कर्मचारी मानले जातात. तब्बल ३१ वर्षांपूर्वीच्या या घटनेला या पुस्तिकेच्या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.

Trending